Bhool Chuk Maaf OTT release: अभिनेता राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा रोमँटिक कॉमेडी 'भूल चूक माफ' चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. रिलीजच्या दोन आठवड्यांत चित्रपटन खूप कमाई केली. आता हा चित्रपट अवघ्या १४ दिवसांत ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. 'भूल चुक माफ' हा या वर्षातील पहिला बॉलिवूड चित्रपट आहे, जो थिएटरनंतर लगेचच ओटीटीवर आला आहे.
थिएटर रिलीजच्या दोन आठवड्यांनंतर, राजकुमार रावचा विनोदी चित्रपट 'भूल चुक माफ' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आजपासूनच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रसारित झाला आहे. अमेझॉन प्राइमकडून एक व्हिडीओ शेअर करत ओटीटी रिलीजची माहिती दिली आहे.
खरं तर हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच वादात अडकला होता. करण शर्मा दिग्दर्शित 'भूल चुक माफ' हा चित्रपट आधी ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरमुळे हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची घोषणा करण्यात आली. पण, थिएटर रिलीज रद्द केल्यानंतर निर्मात्यांविरोधात पीव्हीआर आयनॉक्सने न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने निकाल देत सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा आदेश तिला. त्यानंतर ओटीटी रिलीज रद्द करुन हा चित्रपट २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.