मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि हरहुन्नरी नट म्हणजे भरत जाधव. अतिशय मेहनतीने आणि टॅलेंटच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. अभिनयाची उत्तम जाण असणारे भरत जाधव गेली कित्येक वर्ष रंगभूमीची सेवा करण्यासोबत प्रेक्षकांचंही अविरतपणे मनोरंजन करत आहेत. पण, सिनेइंडस्ट्रीची पाळेमुळे असलेली मुंबई सोडून ते आता कोल्हापुरात शिफ्ट झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं.
भरत जाधव यांनी अमोल परचुरे यांच्या कॅच अप या पॉडकास्टला हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी मुंबईत राहत नसून कोल्हापुरात शिफ्ट झाल्याचा खुलासा केला. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं.
...म्हणून मी कोल्हापुरला शिफ्ट झालो!
"खरं तर मी लोणावळ्यात शिफ्ट होणार होतो. पण, लॉकडाऊन लागल्यानंतर मी कोल्हापुरला गेलो होतो. तिथे मी जमीन घेतली होती. तीदेखील मी विकणार होतो. पण, लॉकडाऊनमध्ये करायचं काय? म्हणून आम्ही कोल्हापुरला गेलो. पत्नी, मुलगा, माझे दोन मित्र आणि आई असे आम्ही कोल्हापुरला गेलो. तिथे मग आम्ही पाणी आणलं, रान साफ करून झाडं लावली. आता त्याचं फार्म हाऊस केलंय".
"तेव्हा माझी आई सतत म्हणत होती की तू इथेच राहा. तिचा हट्ट खूप होता. खरं तर मला लोणावळ्यापर्यंत यायचं होतं. पण, तिचा हट्ट इतका होता की भावनिक झालो. मी भावांशी पण बोललो. तेदेखील म्हणाले की तुझं अप डाऊन जास्त होणार आहे. मी ते घर आईवडिलांसाठीच घेऊन दिलं होतं. वडील गेल्यानंतर आईला वाटलं की हे घर आपल्या कुटुंबाचं राहू दे. म्हणून मग आम्ही तिथेच शिफ्ट झालो. मग आता मी अप डाऊन येऊन काम करतो आणि जातो".