Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:19 IST

कुणाल वर्मा आणि काही अज्ञात लोकांनी मला मारहाण केली. हे सगळे कुणालची पत्नी पूजा बॅनर्जीसमोर घडले असा आरोप फिल्ममेकरने केला. सध्या या प्रकरणाची गोवा पोलीस चौकशी करत आहेत.

पणजी - काही दिवसांपूर्वी टीव्हीवरील प्रसिद्ध जोडपे पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांनी एका जवळच्या मित्रांवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हा प्रकार सांगितला होता. परंतु आता याच जोडप्यावर एका बंगाली फिल्ममेकरने गंभीर आरोप लावला आहे. गोव्यात पूजा आणि कुणालने माझे अपहरण केले आणि एका व्हिलामध्ये मला कैद केले होते. माझ्याकडून लाखो रूपये लुटले असं श्याम सुंदर डे यांनी म्हटले आहे. याबाबत डे यांच्या पत्नी मालबिका यांनी गोवा पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे. 

श्याम सुंदर डे यांनी म्हटलं की, जेव्हा मी गोव्याला सुट्टी इन्जॉय करायला गेलो होतो तेव्हा एकेदिवशी रस्त्यावर काळ्या जॅग्वार कारने मला अडवले. त्यातून २ जण उतरले, त्यांनी मला गाडीबाहेर येण्यास सांगितले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला. सुरुवातीला मी कारमधून बाहेर पडण्यास नकार दिला परंतु जेव्हा मी पूजा बॅनर्जीला तिथे पाहिले, तिला मी माझी बहीण मानत होतो. तेव्हा माझी भीती कमी झाली असं त्यांनी जबाबात सांगितले. TOI ने ही बातमी दिली आहे.

मी बाहेर आल्यानंतर मला पूजा आणि कुणालने त्यांच्या कारमध्ये बसवले आणि गोव्यातील एका अंबर व्हिला येथे नेले. १ जून ते ४ जूनपर्यंत या दोघांनी मला बळजबरीने कैद केले. मला त्या बंगल्यातून कुठेही जाऊ दिले नाही. मी प्रत्येक दिवशी पुजा आणि कुणालला समजवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाचा हवाला दिला परंतु त्या दोघांनी मला सातत्याने धमकी दिली असा आरोप श्याम सुंदर डे यांनी केला आहे.

दरम्यान, कुणाल वर्मा आणि काही अज्ञात लोकांनी मला मारहाण केली. हे सगळे कुणालची पत्नी पूजा बॅनर्जीसमोर घडले. त्यांच्या मित्रांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला. पण एक फोन माझ्याकडे सोडला. त्यातून पैशांची जुळवाजुळव करू शकेन. अपहरणाच्या काळात माझ्याकडून काही कागदपत्रांवरही सही करण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर पुजा आणि कुणालच्या नजरेतून वाचत मी त्या बंगल्याच्या बाथरूममधून एक व्हिडिओ बनवला आणि माझ्या पत्नीला सर्व घटना सांगितली. तिने गोवा पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर ४ जून रोजी मला सुरक्षित त्यातून बाहेर काढण्यात आले असंही श्याम सुंदर डे यांनी म्हटलं. 

२३ लाख लुटले

माझ्या पतीला ४ दिवस कोंडून ठेवले होते. त्यांच्यावर दबाव टाकून एक व्हिडिओ बनवण्यात आला. त्यात ६४ लाख रुपये न दिल्यास नार्कोटिक्स प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. कुणाल आणि पुजाच्या दबावातून येऊन श्याम यांनी २३ लाख रुपये या दोघांना दिले असं श्याम सुंदर डे यांच्या पत्नीने सांगितले. सध्या या प्रकरणाची गोवा पोलीस चौकशी करत आहेत. 

टॅग्स :गुन्हेगारीअपहरण