Ashwini Kulkarni Talk About Marathi Industry: २००४ मध्ये प्रदर्शित झालेला 'पछाडलेला' चित्रपट आजही मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या चित्रपटाची आगळीवेगळी पण, थरकाप उडवणारी कथा सगळ्यांसाठी मनोरंजक ठरली. या सिनेमात 'दुर्गा' मावशीची लेक मनिषा आणि श्रेयस तळपदे यांची भन्नाट लव्ह स्टोरी पाहायला मिळाली होती. अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी (Ashwini Kulkarni) हिने या चित्रपटात मनिषाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. सध्या ही अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
अश्विनी कुलकर्णीने 'द पोस्टमन' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं मराठी चित्रपटांमध्ये स्त्रियांना कसं सादर केलं जात, यावर भाष्य केलं. ती म्हणाली, "मराठी इंडस्ट्रीमध्ये स्त्रियांना चांगल्या पद्धतीने सादर करता आलेलं नाही. 'नो एन्ट्री'मध्ये अंकुश चौधरीनंसई ताम्हणकरला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलं होतं, त्यानंतर फार काही विशेष पाहायला मिळालं नाही. वरण भात लोणचं... मध्ये मी एक सरप्राइज एलिमेंट होते. पण, उंच, हॉट, बोल्ड आणि सुंदर बायकांना ज्या पद्धतीने सादर करायला हव्यात, त्या पद्धतीने ते झालं नाहीये".
पुढे ती म्हणाली, "ऐश्वर्या राय ही प्रचंड सुंदर आहे. पण, मनिरत्नम यांच्या PS-1 आणि PS-2 मध्ये तिला किती सुंदररित्या सादर केलं आहे. हीच ऐश्वर्या 'धूम 2' मध्ये ती बोल्ड आहे. पण दोन्ही रूपं ताकदीची आहेत. मराठी निर्मात्यांना हे समजलेलं नाही. मराठी स्त्री ही सोशिक किंवा बंडखोर असते. सिनेमात महिलांना सुंदररित्या सादर करण्यासाठी फार हॉट सीन्स दाखवावेत असं नाही. प्रत्येकवेळी सई ताम्हणकरसारखी बिकिनी घालणं गरजेचं नाही. एखादी स्त्री साडीमध्येही हॉटच दिसते. जर तिला तशी भूमिका दिले पाहिजे आणि सादरीकरण केलं पाहिजे. हेच बदल मराठी वेब सिरीजमध्ये थोडे थोडे दिसायला लागलेत आहे, जे सकारात्मक आहेत. पुष्पा सिनेमामध्येही तो नाचत असतो. पण, एक सीन ते तिला असा देतात की त्यातून तिची महत्त्व काय आहे या चित्रपटात हे दिसतं. हे सादरीकरण मराठीत मिळत नाही असं मला वाटतं. चित्रपटात जी अभिनेत्रीची जागा आहे ती सशक्त होण्याची गरज आहे असं मला वाटतं".