'शार्क टँक' या रिअॅलिटी शोमधून चर्चेत राहिलेला बिझनेसमन म्हणजे अश्नीर ग्रोव्हर. अश्नीरचं रोखठोक बोलणं आणि स्पष्टवक्तेपणा अशा गोष्टींमुळे तो कायम लोकांमध्ये चर्चेत असतो. अश्नीर ग्रोव्हर त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादही ओढवून घेतो. अश्नीरच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. अश्नीर काही महिन्यांपूर्वी 'बिग बॉस १८'मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी सलमान खानने अश्नीरची चांगली फिरकी घेतली. आता अश्नीरने एका इव्हेंटमध्ये सलमान आणि बिग बॉसविषयी त्याचं मत मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
अश्नीर सलमानविषयी काय म्हणाला
सोशल मीडियावर अश्नीरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात तो म्हणतोय की, "फालतूमध्ये पंगा घेऊन स्वतःसमोर कॉम्पिटिशन त्याने उभी केलीय. मला बोलावलं म्हणून मी शांतपणे तिथे गेलो होतो. तिथे गेल्यावर ड्रामा निर्माण करण्यात आला की, मी तुम्हाला भेटलोच नाही वगैरे. मला तुझं नावही माहित नाही. जर नाव माहित नसेल तर मला का बोलावलं होतं? मला फोन कशाला केला होता?"
अश्नीर पुढे म्हणाला की, "मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की, तुम्ही जर माझ्या कंपनीचे ब्रँड अँबेसेडर आहात तर तुम्ही मला न भेटता ब्रँड अँबेसेडर होऊच शकत नाही. मी सुद्धा कंपनी चालवत होते. त्यामुळे सर्व काम माझ्या माध्यमातून होणार होतं." अशाप्रकारे अश्नीरने पुन्हा एकदा सलमानविषयी मत व्यक्त करुन पंगा घेतल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अश्नीरच्या वक्तव्यावर सलमान कशी प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.