Join us

Filmfare नंतर अनुपम खेर यांनी मागितली सई ताम्हणकरची माफी, काय होतं नेमकं कारण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:42 IST

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची आठवण सांगताना सई म्हणाली...

सई ताम्हणकर (Saie Tamhankar) ही सध्याची मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीत तर ती लोकप्रिय आहेच पण हिंदीतही तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नाही तर सईला जेव्हा 'मिमी'  या हिंदी सिनेमातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तेव्हा सर्वांनाच तिचं कौतुक वाटलं होतं. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचा एक किस्सा सईने नुकताच सांगितला आहे. हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सईची माफी मागितल्याचा तो किस्सा आहे. काय म्हणाली सई?

अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची आठवण सांगताना ती म्हणाली, "आपण सगळेच लहानपणापासून फिल्मफेअर बघत आलेलो आहोत. मी कधीच ही कल्पना केली नव्हती की हिंदी फिल्मफेअरच्या मंचावर मला अवॉर्ड मिळेल. पण काही गोष्टी अविश्वसनीय असतात. मग अशावेळी तुमचा तुमच्या कामावर स्वप्नांवर अजूनच घट्ट विश्वास बसतो."

ती पुढे म्हणाली, "अनुपम खेर हे पुरस्कार देण्यासाठी स्टेजवर आले होते. विजेत्याचं नाव घेण्यासाठी जेव्हा त्यांनी कार्ड उघडलं तेव्हा त्यांना वाचताच आलं नाही. त्यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. बॅकस्टेज अनिल कपूर आणि अनुपम खेर हे एकत्र होते. अनिल कपूरने अनुपम खेर यांना चष्मा दिला आणि सांगितलं की खूप मस्त दिसतोय हा चष्मा लाव. तर याच चष्म्यामुळे त्यांना कार्ड उघडल्यानंतर अक्षरंच दिसेना. मग स्टेजवरच असलेल्या रणवीर सिंहने माझं नाव वाचलं. कारण रणवीरला माहित होतं की नावाचा उच्चार कसा आहे."

अनुपम खेर यांनी मागितली माफी 

सई म्हणाली, "दुसऱ्या दिवशी अनुपम सरांचा मला मेसेज आला. ते मला सॉरी म्हणाले. त्यांनी लिहिलं की 'तुझं नाव मला माहित नाही असं नाहीए. पण बॅकस्टेज हे हे घडलं होतं आणि त्यांनी तो चष्म्याचा किस्सा सांगितला.' मला तेव्हा वाटलं की हे किती छान आहे. अनुपम खेर सारख्या अभिनेत्याला मला मेसेज करण्याची काहीच गरज नव्हती. हेच तुम्हाला बळ देतं, सकारात्मक ऊर्जा देतं याची मला पुरस्कार मिळाल्यानंतर जाणीव झाली."

सई ताम्हणकर आगामी अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्येही दिसणार आहे. तिचा 'भक्षक' हा सिनेमा येतोय ज्यामध्ये भूमी पेडणेकर मुख्य अभिनेत्री आहे. तर सई यामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरअनुपम खेरफिल्मफेअर अवॉर्डबॉलिवूडमराठी अभिनेता