Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तो खाजगी आयुष्यावर बोलत नाही कारण...'; अंजुम बत्राने केली दिलजीत दोसांझची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 16:08 IST

अभिनेता अंजुम बत्राने 'अमर सिंह चमकीला' सिनेमात सहकलाकाराची भूमिका साकारली आहे.

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा (Diljit Dosanjh) 'अमर सिंह चमकीला' सिनेमा नुकताच रिलीज झालाय. सिनेमातील दिलजीतच्या अभिनयाचं सगळेच भरभरुन कौतुक करत आहेत. दिलजीतने यामध्ये पंजाबी गायक चमकीलाची भूमिका साकारली आहे तर परिणीतीने अमरज्योत म्हणजेच त्याच्या पत्नीची भूमिका केली आहे. दोघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. दिलजीत तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. इतकंच काय बॉलिवूड कलाकारही त्याच्या गाण्यांचे आणि आता अभिनयाचे चाहते बनलेत. पण दिलजीत दोसांझने आजपर्यंत कधीच त्याच्या कुटुंबाला सर्वांसमोर आणलं नाही. तो वैयक्तिक आयुष्य एवढं खासगीत का ठेवतो याचं उत्तर अभिनेता अंजुम बत्राने दिलं आहे.

अभिनेता अंजुम बत्राने 'अमर सिंह चमकीला' सिनेमात सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. दिलजीतसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता असं तो म्हणाला. 'बॉलिवूड नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने दिलजीतचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "दिलजीतच्या लग्नाविषयी किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मला काहीच माहित नाही. त्याला त्याच्या खाजगी आयुष्यावर बोलायला आवडत नाही असं त्याने सर्वांना आधीच सांगितलं होतं. काही वर्षांपूर्वीच त्याच्या गाण्यावरुन मोठा वाद झाला होता. तेव्हा लोकांनी त्याच्या घराबाहेर निदर्शनं केली. तेव्हापासून तो कुटुंबाबाच्या सुरक्षेबाबतीत जास्तच सावध झाला. त्यामुळे तो कोणाशीच त्याच्या कुटुंबाविषयी बोलत नाही. त्याने कुटुंबाला लाईमलाईटपासून दूरच ठेवलं आहे."

2018 साली आलेल्या 'वेलकम टू न्यूयॉर्क' सिनेमामध्ये दिलजीतने काम केलं होतं. याच सिनेमात त्याने 'पँट मे गन' हे गाणं गायलं होतं. मात्र गाण्यातील काही वाक्यांमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या. तेव्हा दिलजीतविरोधात एफआयआरही दाखल झाली होती. 

दिलजीत दोसांझ गुणी अभिनेता आणि गायक आहे. त्याच्या गाण्यांच्या कॉन्सर्ट हाऊसफुल होतात. अंबानींच्या पार्टीतही दिलजीतचीच चर्चा होती. तर आता तो 'अमर सिंह चमकीला' मुळे लोकांची वाहवाही मिळवत आहे. दिलजीतची पत्नी असून त्यांना एक मुलगा आहे अशीही चर्चा मध्यंतरी झाली. त्याची पत्नी आणि मुलगी अमेरिकेत असतात अशाही अफवा पसरल्या. मात्र यातलं तथ्य बाहेर आलं नाही.

टॅग्स :दिलजीत दोसांझपरिवारसिनेमाबॉलिवूड