Join us  

"मला दिग्दर्शकाला किस करायंच आहे, रणबीरच्या पायाला...", 'ॲनिमल' पाहिल्यानंतर राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 5:07 PM

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'ॲनिमल' सिनेमा पाहिल्यानंतर केलेलं विधान चर्चेत आलं आहे. 

'ॲनिमल' हा बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटातील कलाकारांचंही सर्वत्र कौतुक होत आहे. टीझरपासूनच या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. अखेर शुक्रवारी(१ डिसेंबर) हा सिनेमा प्रदर्शित झाला. प्रेक्षकांप्रमाणेच 'ॲनिमल' सिनेमाने सेलिब्रिटींनाही भुरळ घातली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'ॲनिमल' सिनेमा पाहिल्यानंतर केलेलं विधान चर्चेत आलं आहे. 

राम गोपाल वर्मा यांनी भारद्वाज रंगन यांना दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल'चा रिव्ह्यू केला. ते म्हणाले, "'ॲनिमल' सिनेमावरुन भविष्यात संघर्ष होणार आहे. पण, मला विश्वास आहे की या सिनेमामुळे सांस्कृतिक बदल नक्कीच घडेल." या मुलाखतीत त्यांनी 'ॲनिमल'मधील एका सीनची तुलना मायकल जॅक्सनच्या बीट इटबरोबर केली. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या न्यूड सीनबाबत भाष्य करत त्याचं समर्थनही त्यांनी केलं. "जेव्हा विजय न्यूड होऊन सेलिब्रेट करतो, तो एक प्रतिभावान क्षण आहे," असंही ते म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, "संदीप वांगा तुम्ही तुमच्या पायांचा फोटो मला द्या.  जेणेकरून मला तुमच्या पाया पडता येईल. मला तुम्हाला किस करायचं आहे. आणि रणबीर कपूरच्या पायांचं चुंबन घ्यायचं आहे. ट्रेलर पाहून मला रणबीरच्या परफॉर्मन्सबद्दल चिंता वाट होती. पण, आता चित्रपट पाहिल्यानंतर एक निर्माता आणि प्रेक्षक म्हणून मी खूश आहे." 

"माझ्या संपूर्ण करिअरमध्ये मी कोणत्या अभिनेत्याची त्याच्या भूमिकेवर अशी मजबूत पकड पाहिलेली नाही. 'ॲनिमल' पाहिल्यानंतर मला हे जाणवलं की संदीप आणि इतर दिग्दर्शकांमध्ये हेच अंतर आहे. बाकिच्यांना असं वाटतं की प्रेक्षक केवळ त्यांच्यासारखा विचार करतात," असंही पुढे राम गोपाल वर्मा म्हणाले. त्यांनी रणबीर कपूर आणि संदीप वांगा यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.  

टॅग्स :रणबीर कपूरराम गोपाल वर्मासिनेमा