Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भटच्या 'जिगरा' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू फिकी, ३ दिवसांत कमावले फक्त 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 10:30 IST

'जिगरा' सिनेमाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवरही 'जिगरा' सिनेमाची जादू फिकी पडत असल्याचं दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या 'जिगरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. आलिया आणि वेदांग रैना या सिनेमात मुख्य भूमिकेत असून भाऊ बहिणीच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. ११ ऑक्टोबरला आलियाचा 'जिगरा' सिनेमा प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसापासून या सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत होते. 'जिगरा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आलियाचा वेगळा अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला. त्यामुळे या सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. पण, आलियाचा 'जिगरा' मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अपुरा पडत असल्याचं चित्र आहे. 

'जिगरा' सिनेमाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवरही 'जिगरा' सिनेमाची जादू फिकी पडत असल्याचं दिसत आहे.  प्रदर्शनाच्या दिवशी 'जिगरा' सिनेमाने ४.५५ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी कमाईत थोडी वाढ झाली. आलिया भटच्या सिनेमाने शनिवारी ६.५५ कोटींची कमाई केली. तर रविवारी या सिनेमाने अंदाजे ५.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. आत्तापर्यंत आलियाच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १६.७५ कोटी कमावले आहेत. 

परदेशातील तुरुंगात कैद असलेल्या आणि मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या आपल्या भावाला सोडवण्यासाठी बहीण कोणत्या थराला जाऊ शकते, याची  गोष्ट 'जिगरा' सिनेमात आहे. आलिया भटने सिनेमात 'सत्या' ही भूमिका साकारली आहे तर अभिनेता वैदांग रैनाने तिच्या भावाची 'अंकुर'ची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन वसन बाला यांनी केलं आहे. आलिया आणि वेदांगबरोबर या सिनेमात आदित्य नंदा, राहुल रविंद्रन, मनोज पाहवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

टॅग्स :आलिया भटसिनेमासेलिब्रिटी