Join us

आलिया भटचा ड्रग्जबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ, म्हणाली "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:51 IST

आलिया भटनं ड्रग्जवर भाष्य केलंय.

Alia Bhatt Ncb Drugs Free Bharat Campaign: गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड आणि ड्रग्ज हे समीकरण चर्चेत आहे. अनेक मोठ्या कलाकारांची नावे यात जोडली गेली. दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंग, रणवीर सिंग ते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. भारतात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे. जर कोणी असे करताना आढळल्यास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) त्यांच्यावर कठोर कारवाई करते. आता २०२५ मध्ये, एनसीबीने 'नशामुक्त भारत'साठी अधिक आक्रमक मोहीम सुरू करण्याचा निर्धार केला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून लोकप्रिय अभिनेत्री आलिया भटने एनसीबीसोबत काम करतेय.

आलिया ही समाजासाठीही जबाबदारीने पुढे येताना दिसली आहे.  नुकतीच तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चंदीगडसोबत ड्रग्जविरोधी जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. 'ड्रग्जला नाही' म्हणत ई-प्रतिज्ञा घेण्याचं तिने आवाहन केलं आहे. आलियाचा एक व्हिडीओ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) चंदीगड विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केलाय. ज्यात आलिया म्हणते, "नमस्कार मित्रांनो, मी आलिया भट आहे, आज मला ड्रग्ज व्यसनाच्या एका गंभीर समस्येबद्दल बोलायचं आहे".

पुढे ती म्हणते, "ड्रग्ज आपल्या जीवनासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी कसे धोकादायक आहे, याबद्दल बोलायचे आहे. ड्रग्जविरुद्धच्या या विशेष मोहिमेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला पाठिंबा द्या. जीवनाला हो म्हणा आणि ड्रग्जला नाही म्हणा. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ड्रग्जविरुद्ध ई-प्रतिज्ञा घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही एनसीबीबरोबर जोडले जाऊ शकता, जय हिंद".

आलियाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात. काहींनी आलियाच्या या कृतीचं कौतुक केलंय. मात्र, काहींनी तिला पती रणबीर कपूरचे नाव घेत ट्रोल केलंय. काही नेटकऱ्यांनी आलिया ही या मोहिमेसाठी योग्य व्यक्ती नसल्याचे सांगत जोरदार टीका केली. या ट्रोलिंगमुळे एनसीबीला नाईलाजाने त्या पोस्टवरील कमेंट्सचा पर्याय बंद करावा लागला.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात विकी कौशल आणि पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. तसेच ती 'अल्फा' या चित्रपटातही दिसरणार आहे. यामध्ये तिच्यासोबत शर्वरी वाघही आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे आणि २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोअमली पदार्थ