Hera Pheri 3: अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'हेरा फेरी' आणि त्यानंतर आलेल्या 'फिर हेरा फेरी' सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं. दोन्ही सिनेमांतील प्रत्येक पात्रांचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. आजही प्रेक्षकांमध्ये प्रियदर्शन यांच्या या एव्हरग्रीन विनोदी चित्रपटांची क्रेझ आहे. त्यामुळेच 'हेरा फेरी ३' कधी येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सध्या 'स्काय फोर्स'च्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या अक्षय कुमारने 'हेरा फेरी ३'बाबतचे संकेत दिले आहेत.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, "प्रेक्षकांइतकाच मी देखील 'हेरा फेरी ३' सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. हा चित्रपट कधी सुरू होणार हे मला माहित नाही, पण सगळं काही अगदी व्यवस्थित झाल्यास यंदा 'हेरा फेरी ३'चे शूटिंग सुरू होऊ शकते", असे तो म्हणाला. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा बाबूभैया, राजू आणि श्याम यांची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सरफिरा'मध्ये अक्षय आणि परेश रावल आमनेसामने होते. नुकतेच दोघांनी जयपूरमध्ये 'भूत बंगला' या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. 'हेरा फेरी'च्या शूटिंग दरम्यान कॅमेऱ्यामागे केलेली मस्ती आजही आठवत असल्याचेही अक्षयने सांगितले.
'हेरा फेरी'चा पहिला भाग २००० मध्ये रिलीज झाला होता. तर 'फिर हेरा फेरी' २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा एकदा बाबू भय्या, राजू आणि श्याम हे तिघेही पुन्हा चाहत्यांना हसवायला येणार आहेत. दरम्यान सध्या अक्षयचा 'स्काय फोर्स' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात इंडियन एअर फोर्समधील अजमादा बोपय्या देवय्या या धाडसी अधिकाऱ्याची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे.