Join us

अक्षय कुमारने असे काय केले होते की चंकी पांडेवर आली होती हॉटेलमध्ये भांडी घासण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 19:00 IST

चंकी पांडेने हा रंजक किस्सा नुकताच द कपिल शर्मा शो मध्ये सांगितला.

ठळक मुद्देचंकी पांडेने सांगितलेला एक किस्सा ऐकून तर उपस्थितांना आपले हसू आवरले नाही.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.

द कपिल शर्मा शो मध्ये नुकतीच सैफ अली खान, अलाया फर्निचरवाला, कुबरा संत, ज्येष्ठ अभिनेत्री फरिदा जलाल, चंकी पांडे आणि तब्बू यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ही मंडळी त्यांच्या जवानी जानेमन या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी सगळ्याच कलाकारांनी आपल्या आयुष्यातील काही किस्से या कार्यक्रमात सांगितले. चंकी पांडेने सांगितलेला एक किस्सा ऐकून तर उपस्थितांना आपले हसू आवरले नाही.

तुमच्यासोबत कधी कोणी प्रँक केला आहे का असे कपिलने या कलाकारांना विचारताच चंकी पांडेने सांगितले की, हाऊसफुल १ या चित्रपटाचे चित्रीकरण आम्ही परदेशात करत होतो. त्यावेळी अक्षय कुमारने आम्हाला सांगितले की, मी संपूर्ण चित्रपटाच्या टीमला ट्रीट देत आहे आणि तो आम्हाला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. आम्ही सगळे मस्त पोट भरून जेवलो. खाऊन झाल्यावर निघायच्या आधी मी वॉशरूमला गेलो. बाहेर येऊन पाहातो तर सगळी टीम गायब होती आणि कोणीच बिल दिले नव्हते. हॉटेलचा मॅनेजर माझ्याकडे बिल मागायला लागला. पण माझ्याकडे पैसेच नव्हते. मला चक्क तो हॉटेलच्या किचनमध्ये भांडी घासायला घेऊन गेला. काय करायचे हेच मला सुचत नव्हते. मी साजिद नाडियाडवालाला कॉल केला तर तो देखील काहीही ऐकायला तयार नव्हता. अखेरीस थोड्या वेळाने साजिद हॉटेलमध्ये आला आणि माझ्यासोबत अक्षयने प्रँक केला असल्याचे त्याने सांगितले.

सैफचा जवानी जानेमन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात त्याच्यासोबतच अलाया फर्निचरवाला आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला समीक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने आतापर्यंत चांगले कलेक्शन केले आहे.

टॅग्स :चंकी पांडेअक्षय कुमार