झी टॉकीज वाहिनीतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात रितेशचा खास गौरव होणार आहे. वेड या सिनेमातून मराठी बॉक्स ऑफीसवर करोडोंची कमाई करून मराठी सिनेमाला कोटींच्या क्लबमध्ये नेणाऱ्या रितेशला झी टॉकीजतर्फे फेव्हरेट स्टाईल आयकॉन पुरस्कार देण्यात येणार आहे. वेड या मराठीतील हिट सिनेमासाठी महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०२२ या पुरस्कारानेही रितेशला गौरवण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . प्रेक्षकांच्या पसंतीतूनच महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या पुरस्कारावर नाव कोरलेल्या कलाकारांना या सोहळ्यात गौरवण्यात येणार असल्याने प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता आहे.
झी टॉकीज वाहिनी नेहमीच नव्या प्रयोगांना प्रोत्साहन देत असते. महाराष्ट्राचा फेवरेट कोण या स्पर्धेच्या औचित्याने गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या सिनेमातील विविध १२ विभागांमधून प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेल्या कलाकारांना झी टॉकीज सन्मानित करणार आहे. यामध्ये अभिनेता रितेश देशमुखने फेवरेट स्टाईल आयकॉनचा किताब पटकावला आहे. मराठी सिनेमाला एक स्टाईल देणाऱ्या रितेशने बॉलिवूडमधील स्टारडम असूनही मराठी सिनेमाच्या प्रेमापोटी केलेल्या कामासाठी त्याला हा पुरस्कार दिला जातो आहे. रितेश हा केवळ पुरस्कार घेण्यासाठी आला नाही तर त्याने महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्याबरोबर एक सुंदर डान्स सुद्धा केला. त्याच बरोबर सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ त्यांच्याबरोबर भरपूर मस्ती सुद्धा केली.