Join us

किरण रावनंतर आता दीपिका पादुकोणची 'मामि'च्या अध्यक्षपदी वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 20:08 IST

अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अभिनेता आमीर खानची पत्नी किरण राव ही 'मामि'ची अध्यक्षा होती. त्यानंतर आता दीपिका या पदाची जबाबदारी पार पाडणार आहे. निवड झाल्यानंतर दिपीकाने सर्वांचे आभार मानले आहेत.

किरण राव सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. किरणच्या राजीनाम्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या सदस्य मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी वोटिंग करण्यात आले. यामध्ये दीपिकाला सर्वाधिक मत मिळाली आणि ती विजयी झाली. दीपिकाने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'माझ्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे आणि यासोबतच खूप मोठी जबाबदारी आहे. माझा मामिच्या उद्दीष्टांवर विश्वास असून भारतासारख्या सिनेमाप्रेमी देशात असा समुदाय बनवण्याचा प्रयत्न करेन जो पूर्णपणे सिनेमासाठी समर्पित असेल.'

दीपिकाची या पदी निवड झाल्यानंतर किरणने तिला शुभेच्छाही दिल्या. ती म्हणाली की, 'मामिच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दीपिका नक्कीच या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडेल. तिच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत.'

अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडली आहे. 'छपाक' सिनेमातून ती लग्नानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ती करते आहे आणि लवकरच ती या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणकिरण राव