बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने बऱ्याच काळानंतर २०२३ मध्ये 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन केले होते. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून शाहरुख पुन्हा एकदा चर्चेत आला. नुकतीच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल बातमी समोर आली आहे. निर्माते 'पठाण २'च्या तयारीला लागले आहेत. 'पठाण २' देखील यशराजच्या स्पाई युनिव्हर्सचा भाग आहे. आता निर्माते या चित्रपटात शाहरुखच्या विरुद्ध एका मोठ्या अभिनेत्याला घेण्याचा विचार करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा अभिनेता साउथचा स्टार आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, आदित्य चोप्रा 'पठाण २'मध्ये शाहरुख खानच्या विरुद्ध साऊथचा स्टार ज्युनिअर एनटीआरला घेऊ शकतात. मात्र, निर्मात्यांनी अद्याप ज्युनियर एनटीआरच्या एंट्रीची अधिकृत माहिती दिलेली नाही. हे लक्षात घ्या की ज्युनियर एनटीआर स्पाई युनिव्हर्सचा भाग बनण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तो हृतिक रोशनसोबत 'वॉर २'मध्ये दिसला होता. 'वॉर २' मध्ये ज्युनियर एनटीआर नकारात्मक भूमिकेत दिसला होता. रिपोर्ट्सनुसार, 'पठाण २' मध्ये ज्युनियर एनटीआरची भूमिका खूपच दमदार असणार आहे.
'पठाण २' येणार भेटीलानुकतेच दुबईतील एका कार्यक्रमात शाहरुख खानच्या 'पठाण २'ची पुष्टी झाली आहे. शाहरुख खानही त्या कार्यक्रमाचा भाग होता. रिअल इस्टेटच्या कार्यक्रमात स्टेजवर डेव्हलपर 'पठाण २' बद्दल बोलला होता. तो म्हणाला होता की, ''जेव्हा एखादा ब्लॉकबस्टर चित्रपट असतो, तेव्हा त्याचा सीक्वल असतो, बरोबर? 'पठाण' प्रमाणे, 'पठाण २' येत आहे.'' रिपोर्ट्सनुसार, हा सीक्वल केवळ 'पठाण'ची कथा पुढे नेण्यासाठीच नाही, तर वायआरएफच्या स्पाई युनिव्हर्समधील आगामी भागात एका मोठ्या संघर्षाची पायाभरणी करण्यासाठी देखील डिझाइन केला गेला आहे.