Join us

आयुषमान खुराणानंतर आता या दोन अभिनेत्यांची 'बॉर्डर २'मध्ये एन्ट्री, एकाने तर घेतली वडिलांची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 13:13 IST

Border 2 : सनी देओल अभिनीत बॉर्डर २च्या कास्टिंगबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुषमान खुरानानंतर आता आणखी दोन अभिनेत्यांनी चित्रपटात प्रवेश केला आहे.

बॉर्डर २ (Border 2) चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. निर्माते चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये व्यग्र आहेत. हा चित्रपट बॉर्डरसारखा प्रभावी बनवता यावा यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. सनी देओल (Sunny Deol) स्टारर या चित्रपटात आयुषमान खुराना(Ayushmaan Khurana)ने प्रवेश केल्याची बातमी अलीकडेच आली होती आणि आता या यादीत आणखी दोन कलाकारांची नावे जोडली गेली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार एमी विर्क आणि अहान शेट्टी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर हा आयकॉनिक चित्रपट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लोंगेवाला युद्धावर आधारित आहे, ज्यामध्ये केवळ १२० भारतीय सैनिकांनी शौर्याने लढा देऊन पाकिस्तानचा पराभव केला होता आणि त्यांना माघार घ्यायला भाग पाडले होते. भारतीय हवाई दलानेही या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली आणि युद्ध निर्णायक बनवले. आता तब्बल २६ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार असल्याची चर्चा आहे. 

सनी देओल आहे खूप उत्सुक

बॉर्डर २बाबत सनी देओलही खूप उत्साहित आहे. विशेषत: गदर २ला मिळालेल्या प्रतिसादानंतर तो बॉर्डर २ बद्दल अधिकच उत्सुक झाला आहे. सध्या कास्टिंग चालू आहे. सनी या चित्रपटाचा एक भाग असेल पण उर्वरित भूमिकांसाठी इतर कलाकारांची निवड केली जात आहे. आयुषमाननंतर आता एमी विर्क आणि अहानच्या नावाची चर्चा सुरू आहे.

अहान शेट्टीची वर्णी

अहान शेट्टीदेखील बॉर्डर २मध्ये दिसणार आहे. त्याचे वडील सुनील शेट्टीने बॉर्डरमध्ये काम केले होते. तो आर्मी ऑफिसर भैरोसिंगच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. या चित्रपटाची कथा अद्याप समोर आली नसली तरी तो पुन्हा कोणत्या ना कोणत्या युद्धावर आधारित असणार हे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :सुनील शेट्टीसनी देओलआयुषमान खुराणा