Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आदिपुरुष'नंतर कुठे गायब होता ओम राऊत? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला- "मी वर्षभर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:32 IST

आदिपुरुष रिलीज झाल्यानंतर वर्षभर मीडियापासून लांब राहिला; ओम राऊत पहिल्यांदाच याविषयी खुलासा केलाय (om raut, adipurush)

२०२३ साली रिलीज झालेला 'आदिपुरुष' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. रामायणावर आधारीत 'आदिपुरुष' सिनेमावर प्रचंड प्रमाणात टीका झाली. प्रभासने साकारलेली प्रभू श्रीरामांची भूमिका लोकांना तितकीशी आवडली नाही. सिनेमातले VFX, कल्पनाशक्तीचा वापर करुन घेतलेली सिनेमॅटिक लिबर्टी अशा अनेक गोष्टींवर उलटसुलट चर्चा झाली. 'आदिपुरुष' रिलीज होऊन एक वर्ष उलटलं तरीही ओम राऊत कुठेच दिसला नाही. तो वर्षभर जणू गायबच होता. अखेर एका मुलाखतीच्या निमित्ताने ओम राऊतने सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

म्हणून वर्षभर ओम राऊत गायब होता

वर्षभरात मीडियापासून का लांब राहिला? असा प्रश्न ओम राऊतला विचारण्यात आला. त्यावेळी त्याने उत्तर दिलं की, "मला ट्रोलिंगचा कंटाळा आला होता. म्हणजे  कुठे बाहेर जेवायला गेलो अन् त्याचा फोटो टाकला तर वाट्टेल ते ट्रोलिंग व्हायचं. त्यामुळे खूप त्रासदायक वातावरण निर्माण झालं होतं. पण आता ठरवलं की काय वाट्टेल ते होऊन जाऊदे. जोवर चित्रपट प्रमोशनला येत नाही तोवर त्यावर बोलून काय फायदा होत नाही. ट्रोलिंगचा त्रास झाला सुरुवातीला पण आता मी विचार नाही करत. ज्यांचा चेहराच नाही अशा ट्रोलर्सला फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही. चादरीच्या आडून काहीतरी बोलणं सोप्पं आहे. चित्रपट पाहून समोरासमोर काहीतरी चर्चा होणं, संभाषण होणं गरजेचं आहे. हे ट्रोलिंग चित्रपटापुरतं ठीक आहे, पण मी बायकोसोबत फोटो टाकल्यावर त्याच्यावर कोण काहीतरी बोलत असेल तर त्याला अर्थ नाही. जे प्रेक्षक थिएटरमध्ये सिनेमा पाहायला येतात त्यांना चित्रपटावर समीक्षा करायचा हक्क आहे."

ओम राऊत या मुलाखतीत 'आदिपुरुष'बद्दल पुढे म्हणाला की, "आदिपुरुषने बॉक्स ऑफिसवर जी कमाई केली आणि ही जी चर्चा झाली त्यामध्ये खूप तफावत आहे. पहिल्याच दिवशी आम्ही ७० कोटींची भारतात कमाई केली. नंबर मोठे असल्याने चित्रपट निर्माता जागेवर राहतो. तो पुढच्या सिनेमासाठी विचारणा करतो. पण आमचं परसेप्शन (दृष्टीकोन) कायम राहिला असता तर आम्ही आणखी मोठे नंबर बघू शकलो असतो. ते घडलं नाही याचं दुःख आहे."

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉनरामायणबॉलिवूड