अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) 'हीरामंडी' सीरिजमध्ये बिब्बोजानच्या भूमिकेत दिसली. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तसंच तिची गजगामिनी स्टाईल चाल खूप व्हायरल झाली. संजय लीला भन्साळींच्या या महत्वपूर्ण सीरिजमध्ये अदितीला महत्वाची भूमिका साकारायची संधी मिळाली. यानंतर तिला अनेक सिनेमा, सीरिजच्या ऑफर आल्या असतील असंच अनेकांना वाटेल. पण 'हीरामंडी'नंतरही काम आलं नाही असा आश्चर्यकारक खुलासा अदितीने नुकताच केला आहे.
अदिती राव हैदरी नुकतीच फराह खानच्या युट्यूब चॅनलवर आली होती. यावेळी फराहने तिच्या 'हीरामंडी'तील अभिनयाचं आणि गजगामिनी चालचं कौतुक केलं. यानंतर तिच्याकडे सिनेमांची रांग लागली असेल असंही फराहने तिला विचारलं. यावर अदिती म्हणाली,"हीरामंडीला खूप प्रेम मिळालं. सगळीकडे सीरिजचीच चर्चा होती. नंतर मला वाटलं की आता मला अनेक इंटरेस्टिंग गोष्टी ऑफर होती. अक्षरश: ऑफर्सचा पाऊस पडेल. पण बघते तर काय...मी नुसतीच बसली आहे. नक्की काय चाललंय? दुष्काळ पडल्यासारखं वाटलं."
यावर फराह गंमतीत म्हणाली, "म्हणूनच तू लग्न केलं. काम तर मिळत नाहीए लग्नच करते.' मग अदिती हसतच म्हणाली,"हो खरंच..आम्ही अक्षरश: काम करुन लग्न आणि परत काम आणि पुन्हा लग्न केलं. पण खूप मजा आली."
अदिती राव हैदरी 'हीरामंडी'च्या शूट आणि प्रमोशनवेळीच लग्नबंधनात अडकली. गेल्या वर्षी तिने साउथ अभिनेता सिद्धार्थसोबत लग्न केलं. त्यांनी दोन वेळा लग्न केलं. अदिती लवकरच इम्तियाज अलीच्या सीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अर्जुन रामपाल आणि अविनाश तिवारी दिसणार आहे.