Join us

"रस्त्यावरील दगडांमुळे चेहरा फाटला अन्...", शुभा खोटेंनी सांगितला 'तो' थरारक प्रसंग, काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:49 IST

"सायकलिंग करताना पडले अन् चेहरा...", शुभा खोटेंनी सांगितला 'तो' प्रसंग

Shubha Khote: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शुभा खोटे. 'ससुराल', 'देख कबीरा रोया' , 'संजोग', 'बरखा', 'ग्रहस्ती', 'छोटी बहन' यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. शुभा खोटे यांनी १९५५ मध्ये 'सीमा' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सायकलिंगमुळे शुभा खोटे यांना या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. पण या चित्रपटातील एका सीनच्या शूटिंगदरम्यान एक विचित्र घटना घडली. त्यामुळे शुभा खोटे यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. 

नुकतीच शुभा खोटे यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'सीमा' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, रस्त्यावर पडल्याने त्यांच्या चेहऱ्याला जबर मार लागला होता. त्या प्रसंगाविषयी सांगताना शुभा खोटे म्हणाल्या,"सीमा चित्रपटावेळी सगळं छान झालं. मला आठवतंय एप्रिलपासून आमचं शूट सुरु झालं होतं आणि मे महिन्यात माझा एक सायकलचा सीक्वेंस झाला. त्यामध्ये मी एका चोराला पकडते. त्याला सायकलवरती फॉलो करते, असा तो सीन होता. त्याचदरम्यान, माझी सायकल रस्त्यावरुन स्लीप झाली आणि मी पडले. त्यावेळी रोडचं काम चालू होतं आणि त्या रस्त्यावरील सगळ्या दगडींमुळे माझा चेहरा फाटला होता. चेहऱ्याच्या एका बाजूला गंभीर दुखापत झाली. तेव्हा ऑपरेशन करताना फाटलेल्या चेहऱ्यातून लाईट दिसत होती."

त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं की,"या घटनेनंतर पुढे आपलं काही होणार असं वाटत होतं. त्यानंतर मी प्रोडक्शनचं सगळं काम शिकले. डायरेक्शन, एडिटिंगला जाऊन बसायचे. आपल्याला आता अभिनय करता येणार नाही, असं वाटू लागलं होतं. यादरम्यान, मी एका चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलं होतं." असा खुलासा त्यांनी मुलाखतीत केला.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीमराठी अभिनेता