मनोरंजन विश्वात अशा अनेक घटना घडल्या असतात ज्या ऐकून आजही मन सुन्न होतं. त्या विशिष्ट कलाकारांच्या चाहत्यांना चांगलंच दुःख होतं. अशीच एक घटना मनोरंजन विश्वात घडली होती जी आठवली की अनेकांना सुन्न व्हायला होतं. प्रसिद्ध अभिनेत्रीला वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जीव गमवाला लागला होता. अभिनेत्रीच्या नोकरांनीच तिची हत्या केली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे राणी पद्मिनी. काय घडलं होतं? जाणून घ्या
कोण होती राणी पद्मिनी?
राणी पद्मिनी ही साउथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. राणीचा जन्म १९६२ साली केरळमध्ये झाला. साउथ इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख अभिनेत्री म्हणून राणीला ओळखलं जात होतं. राणीची आई इंदिरा कुमारी यांचंही अभिनेत्री व्हायचं स्वप्न होतं. पण तिच्या आईचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु राणीने मात्र आईचं स्वप्न पूर्ण केलं. पुढे कमी वयात राणीने अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली. १९८० च्या आसपास वयाच्या राणीने तब्बल ३० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये अभिनय केला. तामिळ आणि मल्याळम इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांसोबत राणीने काम केलं.
अभिनेत्रीच्या नोकरांनीच केली होती तिची हत्या
अन् मग तो दिवस काळा दिवस उजाडला. हा दिवस राणीच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. १५ ऑक्टोबर १९८६ चा दिवस. राणी तिच्या आईसोबत अन्ना नगर येथे एका भाड्याच्या घरात राहत होती. राणीचे तीन नोकर जेबराज, वॉचमन लक्ष्मी नरसिम्हा कुट्टी आणि त्यांचा कूक गणेशन या तिघांनी राणीच्या आईवर हल्ला करुन तिला ठार केलं. आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून राणी तिथे गेली. परंतु तीन नोकरांनी तिच्यावरही हल्ला करुन तिची हत्या केली.
या तिघांनी राणी आणि तिच्या आईची हत्या का केली? हे कोडं कधी सुटलं नाही. पण ज्यांनी हत्या केली ती तीनही माणसं आधीपासून गुंड प्रवृत्तीचे होते. त्यामुळे चोरीच्या कारणास्तव राणी आणि तिच्या आईची हत्या या तिघांनी केली, असं बोललं जाऊ लागलं. पोलिसांनी पुढे या तिघांना अटक केली आणि त्यांना तुरुंगात डांबलं. अशाप्रकारे करिअरच्या शिखरावर असताना अवघ्या २४ व्या वर्षी राणीला आपला जीव गमवावा लागला.