Radhika Apte: हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राधिका आपटे. आतापर्यंत कायम हटके आणि वैविध्यपूर्ण कथानकाला प्राधान्य देत ती चित्रपटांमध्ये धाटणीच्या भूमिका साकारताना दिसली. रंगभूमीसह मराठी-हिंदी चित्रपटांमध्येही राधिकाने काम करत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ओटीटी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने २००५ साली शाहिद कपूरच्या लाईफ हो तो ऐसी चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राधिका तिच्या कामासह स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. मात्र, करिअरच्या सुरुवातीलाच राधिका आपटे एका प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली होती, नेमकं काय घडलेलं जाणून घेऊया...
बॉलिवूड,मराठीसह साऊथ सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राधिका आपटेला शुटींग दरम्यान एक वाईट अनुभव आला होता. नेहा धुपियाच्या चॅटशोमध्ये तिने याबाबत खुलासा केला होता. तमिळ सिनेमाच्या सेटवर सहकलाकाराने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं तिने म्हटलं. त्याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, " त्या सिनेमाच्या सेटवर माझा पहिला दिवस होता. पण एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुदल्या करण्यास सुरुवात केली.मला धक्का बसला. सिनेमाच्या आधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो. तरीही तो अभिनेता असा प्रकार कसा काय करु शकतो? मी त्याच वेळी त्याच्या थोबाडीत मारली. " असा खुलासा तिने केला होता. राधिकाने सांगितलेला हा प्रसंग ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या.
राधिका आपटेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'लाईफ हो तो ऐसी' चित्रपटानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर ती 'अंतहिन', 'पुणे ५२ ','पोस्टकार्ड', या मराठी तसेच 'बदलापूर' आणि 'हंटर','अंधाधून' या हिंदी चित्रपटातही ती झळकली.