Join us

अभिनेत्री क्रांती रेडकर झाली आई, दिला जुळ्या मुलींना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 19:23 IST

अभिनेत्री क्रांती रेडकरने गोड बातमी दिली असून तिने ३ डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.

ठळक मुद्देक्रांतीने दिला जुळ्या मुलींना जन्मक्रांतीवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री क्रांती रेडकरने गोड बातमी दिली आहे. क्रांतीने ३ डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. दुहेरी कन्यारत्न प्राप्तीमुळे ती आनंदात आहे. 

मुंबईच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये क्रांतीने या जुळ्या मुलींना जन्म दिला. क्रांतीचे मित्रमैत्रिणी या बातमीने खूप खूश आहेत. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रांतीने मार्च २०१७मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडेसोबत लग्न केले. इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या डोहाळे जेवणाच्या फोटोमुळे क्रांतीकडे गुड न्यूज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी मिळाली आहे.'जत्रा' सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिनं 'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे'  यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.

29  मार्च 2017 ला क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकली होती. त्यावेळी लोकमतसह खास बातचीतमध्ये तिने सांगितले होते की,  "माझे पती हे देश सेवेत असल्याने त्यांच्यासाठी त्यांची ओळख ही गुलदस्त्यात ठेवणे हे गरजेचे असते आणि त्याचमुळे आम्ही दोघांनी अगदी साधेपणाने लग्न करायचे ठरवले. मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यातील वेडेपणा आयुष्यभर राहू देणारा नवरा मला मिळाला पाहिजे असे माझ्या मैत्रिणींना नेहमीच वाटायचे आणि तो तसाच आहे. तो नेहमीच माझ्यातला मी पणा मला जपायला सांगत असतो. तो आणि मी स्वभावाने पूर्णपणे विभिन्न आहोत. तो तणावात असेल तर काहीच क्षणात मी तो तणाव दूर करण्यास सक्षम असते. आम्ही पती-पत्नी होण्याआधी एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत आणि आयुष्यभर राहाणार यात काही शंकाच नाही. मी लग्नानंतरही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून माझे करियर सुरूच ठेवणार असल्याचे तिने म्हटले होेते.

टॅग्स :क्रांती रेडकर