सध्या बी टाऊनमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचीच चर्चा सुरु आहे. दोघांचा उदयपूर येथे शाही थाटात लग्नसोहळा पार पडणार आहे. परिणीती चोप्रा बॉलिवूडशी संबंधित आहे. तर दुसरीकडे राघव चढ्ढा आम आदमी पार्टीचे खासदार आहेत. केवळ परिणीती चोप्राच नाही तर आताच्या घडीला अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी राजकारण्यांसोबत संसार थाटला. राजकारण आणि बॉलिवडूचा गेल्या अनेक दशकांचा संबंध आहे.
टारझन द वंडर कार आणि वॉन्टेड यांसारख्या चित्रपटांमध्ये आयशा टाकिया झळकली. आयशाने नेते फरहान आझमी यांच्याशी 2009 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर मात्र तीने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. फरहान आझमी हा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. एवढंच नाही तर तिने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. दोघांनीही बरेच दिवस आपले नाते लपवून ठेवले होते. आता ती गृहिणीचे जीवन जगत असून फरहान आणि आयशाला एक मुलगाही आहे, ज्याचं नाव मिकेल आहे.
प्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनीही नेते रवी राणासोबत लग्न केले. सामूहिक विवाहसोहळ्यात हे लग्न झालं होतं. या विवाहसोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. नवनीत राणा यांनी तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे. लग्नानंतर नवनीत कौर राणा यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला. सध्या त्या अमरावतीच्या खासदार आहेत.