Join us

देव आनंद यांचे ७३ वर्ष जुनं घर होणार जमीनदोस्त; ४०० कोटींची डील, वाचा तिथे काय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 19:29 IST

आपल्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिवंगत अभिनेते देव आनंद हे त्यांच्या चाहत्यांसाठी आजही जिवंतच आहेत.

Dev Anand Juhu Bungalow Sold : आपल्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिवंगत अभिनेते देव आनंद हे त्यांच्या चाहत्यांसाठी आजही जिवंतच आहेत. आपला काळ गाजवणारे देव आनंद आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यामागील कारण म्हणजे त्यांचं घर. होय, दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्या जुहू येथील घराची विक्री झाली आहे. या घरात देव त्यांची पत्नी कल्पना कार्तिक आणि त्यांची मुले सुनील, आनंद आणि देविना यांच्यासोबत दीर्घकाळ वास्तव्य करत होते. 

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, देव आनंद यांच्या आयुष्यातील अतिशय सुंदर अन् अविस्मरनीय आठवणींचं सांक्षीदार असलेलं हे घर आता जमीनदोस्त होणार आहे. कारण आता हा बंगला २२ मजली टॉवरमध्ये बदलला जाणार आहे. मुंबईतील जुहू येथील हा बंगला रिअल इस्टेट कंपनीला विकण्यात आला आहे. त्याचा करार झाला असून आता कागदोपत्री काम सुरू आहे. लक्षणीय बाब म्हणजे देव आनंद यांचे हे घर ३५०-४०० कोटी रुपयांना विकले गेल्याचे कळते. हा बंगला पाडल्यानंतर या जागेवर २२ मजली उंच टॉवर बांधण्यात येणार आहे. 

सेलिब्रेटी, राजकीय मंडळी आणि मोठ मोठे उद्योगपती यांचे या परिसरात वास्तव्य असते. त्यामुळे जुहू हा बड्या लोकांचा परिसर म्हणून देखील या भागाला संबोधले जाते. देव आनंद यांचा हा बंगला परिसरातील अनेक बड्या उद्योगपतींच्या बंगल्यांमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि डिंपल कपाडिया यांसारख्या स्टार्स देखील देव आनंद यांच्या बंगल्याजवळील अपार्टमेंटमध्ये राहतात. 

 ७३ वर्ष जुनी वास्तू होणार जमीनदोस्तदेव आनंद यांनी जेव्हा हा बंगला बांधला तेव्हा ही जागा तितकीशी लोकप्रिय नव्हती असे बोलले जाते. मात्र, आजच्या घडीला याला जुहूचा सर्वात पॉश आणि महागडा परिसर म्हणून ओळखले जाते. मीडियाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत देव आनंद यांनी त्यांच्या घराविषयी सांगितले होते की, हे घर आम्ही १९५० मध्ये बांधले. तेव्हा जुहू हे एक लहानसे गावच होते. आजूबाजूला जंगल होतं. आता जुहू खूप गजबजलेला परिसर झाला आहे.

टॅग्स :देव आनंदबॉलिवूडमुंबई