बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडीयन राजपाल यादव सध्या चर्चेत आहे. ९ कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात राजपालवर झालेल्या कारवाईनंतर चित्रपटसृष्टीतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राजपालचा जवळचा मित्र आणि सहकलाकार अक्षय कुमार याने या विषयावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले असून राजपालला दिलेल्या एका जुन्या सल्ल्याची आठवण करून दिली आहे.
"चित्रपट निर्मितीच्या भानगडीत पडू नकोस" अक्षय कुमारने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्याने राजपाल यादवला खूप आधीच सावध केले होते. अक्षय म्हणाला, "राजपाल हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे आणि लोक त्याच्या अभिनयावर प्रेम करतात. मी त्याला पूर्वीच सांगितले होते की, तू फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित कर, चित्रपट निर्मितीच्या भानगडीत पडू नकोस. चित्रपटाची निर्मिती करणे ही एक अतिशय जोखमीची बाब आहे आणि त्यात अनेक आर्थिक गुंतागुंतीच्या गोष्टी असतात."''आपण अभिनेते आहेत त्यामुळे निर्माता होण्याची शक्कल लढवू नकोस, हे मी त्याला सांगितलं होतं. जर तू अभिनेता असशील तर कायम अभिनेताच राहा. कोणत्याही शॉर्टकट मार्गाने पैसे कमावण्याचा विचार करु नकोस. मला आशा आहे, या परिस्थितीतून राजपाल लवकरच बाहेर पडेल. तो प्रत्येक भूमिकेत १०० नाही १२०-१४० टक्के देतो. त्याच्यासोबत काम करायला नेहमीच मजा येते. आमच्यातली केमिस्ट्री खूप छान आहे. याशिवाय जेव्हा प्रियदर्शन सरांचा सिनेमा असतो तेव्हा आणखी छान वाटतं.'', अशाप्रकारे अक्षयने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.काय आहे नेमके प्रकरण? राजपाल यादव यांनी २०१० मध्ये 'अता पता लापता' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दिल्लीतील एका व्यापाऱ्याकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह ही रक्कम आता ९ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. हे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामुळे राजपालला काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होता. सध्या या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. राजपालने काही पैसे फेडले असून उर्वरीत रक्कम राजपाल लवकरात लवकर जमा करेल, अशी आशा आहे.