बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. मात्र त्याला अद्याप म्हणावं तसं यश मिळालंच नाही. त्याची तुलना कायम वडील अमिताभ बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या रायशी होत राहते. अनेकदा अभिषेकने यावर सडेतोड उत्तरंही दिलं आहे. कितीही ट्रोल झाला, तुलना झाली तरी अभिषेकचा संयम वाखणण्याजोगा आहे. नुकतंच अभिषेक लेक आराध्याबद्दल बोलला आहे. तिच्याकडून त्याने एक अपेक्षा व्यक्त केली आहे.
नुकतंच एका मुलाखतीत अभिषेक बच्चनला प्रश्न विचारण्यात आला. कुटुंबातील सदस्यांच्या यशाचा तुझ्यावर परिणाम होतो का? यावर तो म्हणाला, "गेल्या २५ वर्षांपासून मी हा प्रश्न सतत ऐकतोय. आता मला याची सवय झाली आहे. जर तुम्ही माझी वडिलांशी तुलना करत असाल तर तुम्ही सर्वोत्तम माणसासोबत करत आहात. जर तुम्ही सर्वोत्तम सोबत तुलना करत आहात तर कुठे ना कुठे मला वाटतं की मी कदाचित मी या दिग्गज नावांमध्ये गणना होण्याच्या लायकीचा आहे. मी अशाचप्रकारे याकडे बघतो."
तो पुढे म्हणाला, "ते माझे आईवडील आहेत. माझं कुटुंब, माझी पत्नी आहे. मला त्यांच्या यशाचा अभिमान वाटतो. आज आम्ही इथे एसीमध्ये बसून कॉफी पित आहोत. तिकडे ८२ वर्षांचा व्यक्ती सकाळी ७ वाजता केबीसी चं शूट करतोय. ते आदर्श आहेत. मलाही असंच बनायचं आहे. मी रात्री झोपतो तेव्हा हाच विचार करतो की जेव्हा मी ८२ वर्षांचा असेन तेव्हा माझी मुलगीही माझ्याबद्दल हेच बोलेल की माझे वडील अजूनही काम करत आहेत."
"मी आज जो कोणी आहे तो कुटुंबामुळेच आहे. मी जे करतो ते त्यांच्यासाठीच करतो. त्यांचं मत माझ्यासाठी महत्वाचं आहे. मला माझ्या नावावर गर्व आहे जे मला माझ्या आजोबांनी दिलं आहे. पण मला माझ्या आडनावावर जास्त गर्व आहे." असंही तो म्हणाला.