'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा रिएलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फराह खान हा शो होस्ट करताना दिसणार आहे. तर सर्वांचा लाडका गायक आणि बिग बॉस मराठी फेम अभिजीत सावंत या शोमध्ये सहभागी झाला आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफच्या सेटवरील एक व्हिडिओ अभिजीतने शेअर केला आहे.
'मास्टरशेफ ऑफ इंडिया' या लोकप्रिय शोचा पुढचा सीझन सुरू होत आहे. कुकींगची आवड असणाऱ्या अनेकांना या मंचावर आपलं टॅलेंट दाखवायची संधी मिळायची. आता पहिल्यांदाच या शोमध्ये सेलिब्रिटी त्यांचं कुकींग टॅलेंट दाखवणार आहेत. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवर फराह खानने सगळ्यांसाठी स्वत:च्या हाताने बनवलेली मटण बिर्याणी आणली होती. याचा व्हिडिओ अभिजीत सावंतने शेअर केला आहे. फराहच्या हातची मटण बिर्याणी खाऊन अभिजीत तृप्त झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
'सेलिब्रिटी मास्टर शेफ'मध्ये तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, अर्चना गौतम, राजीव अदातिया, निक्की तांबोळी, फैसल मलिक, दीपिका कक्कड, उषा नाडकर्णी, कबिता सिंह हे कलाकार सहभागी होणार आहेत. या शोचं परिक्षण मास्टरशेफ इंडिया फेम रणवीर बरार आणि विकास खन्ना करणार आहेत. लवकरच 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे.