Join us

आमिर खानचा लेक मराठी रंगभूमीच्या प्रेमात; कौतुक करत म्हणाला, "आत्ताच वस्त्रहरण पाहिलं..."

By ऋचा वझे | Updated: February 10, 2025 11:52 IST

मराठी नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांबद्दल म्हणाला...

बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) सध्या अभिनयात नशीब आजमावत आहे. त्याचा पहिला 'महाराज' सिनेमा ओटीटीवर आला होता. तर आता 'लव्हयापा' हा सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. आपल्या ३१ वर्षीय लेकाला आमिर पूर्ण पाठिंबा देत आहे. त्याने 'लव्हयापा'चे स्क्रीनिंगही ठेवले ज्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. अगदी शाहरुख-सलमानही स्क्रीनिंगला आले होते. सिनेमानिमित्ताने जुनैद खानने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी त्याने तो मराठी थिएटरचा चाहता असल्याचा खुलासा केला. 

जुनैद खान सिनेमांमध्ये येण्यापूर्वी रंगभूमीवर काम करायचा. तो आधी नाटकाच्या प्रेमात पडला होता. नंतर त्याने सिनेमात एन्ट्री घेतली. मराठी कंटेंट पाहतोस का असं विचारलं असता जुनैद म्हणाला, "  मी लहान असताना आमची घरातली मदतनीस दुपारी तिच्या  ब्रेकमध्ये ईटीव्ही मराठी लावायची. तर मीही तिच्यासोबत बसून ईटीव्हीवरचे कार्यक्रम पाहायचो. मी मराठी नाटक पाहिले आहेत. मराठी थिएटर खूप कमाल आहे. त्यांचे प्रेक्षकही खूप निष्ठावंत आहेत. हिंदी आणि इंग्लिश थिएटर मुंबईत कोणीही बघत नाही. तेच नेहमीचे ४००-५०० लोक येतात. पण मराठीचे प्रेक्षक कमाल आहेत. ते नेमाने नाटक बघतात याचं मला अप्रुप वाटतं. तसंच मराठी रंगभूमीवर खरोखरंच जबरदस्त काम होतं. अनेक कसलेले कलाकार आहेत ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे."

तो पुढे म्हणाला, "अहिल्यानगरचं 'खटारा' हे नाटक मुंबईत आलं होतं ते मी पाहिलं.  त्यानंतर गाजलेलं नाटक 'वस्त्रहरण' तेही पाहिलं. ते तर खूप वर्षांपासून सुरु आहे. मी आताच पाहिलं. मोहित टाकळकर आहेत जे रंगभूमीवर कमाल काम करतात. मी मराठी सिनेमे इतके पाहिले नाही. अतुल कुलकर्णींचा 'नटरंग' पाहिला. मला जितकं आठवतंय त्यानुसार तोच एक सिनेमा मी पाहिला आहे."

मराठीत काम करणार का?

"मराठीत काम करण्याबद्दल जुनैद म्हणाला, "मला मराठी फार चांगली बोलता येत नाही. पण पूर्ण समजते. तसंच मी नक्कीच मराठीत काम करेन. अरुंधती नाग यांच्यासोबतही मी काम केलं आहे ज्या आधी काही वर्षांपूर्वी मराठी थिएटर करायच्या. त्यामुळे मला नक्कीच मराठीत काम करायला आवडेल."

टॅग्स :जुनैद खानबॉलिवूडनाटक