'आई कुठे काय करते' मालिका आता लवकरच संपणार आहे. या मालिकेने ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'आई कुठे काय करते' मालिका संपायला अवघे ७ दिवस बाकी आहेत. ५ वर्षांपासून अखंडपणे प्रेक्षकांंचं मनोरंजन करत असलेली ही मालिका आता अंतिम टप्प्यावर आली आहे. गेल्या ५ वर्षात मालिकेचे कलाकार, वेळ बदलली असली तरीही TRP च्या शर्यतीत मालिका टॉपवर राहिली. अशातच 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज झालाय.
'आई कुठे काय करते'चा शेवटचा भाग
स्टार प्रवाहने सोशल मीडियावर 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज केलाय. या प्रोमोत दिसतं की, अरुंधती संजना-अनिरुद्धला देशमुख कुटुंबातील 'समृद्धी' बंगल्यातील त्यांचा हिस्सा देते. तो हिस्सा घेऊन संजना-अनिरुद्ध रुममध्ये जाताच तेव्हा अरुंधती अनिरुद्धला त्याच्या चुकांची जाणीव करुन देते. "शेवटी नियतीने तुम्हाला तुमची पातळी दाखवली", असं म्हणत अरुंधती दोघांना घराबाहेर काढून त्यांच्या तोंडावर दार बंद करते. "आता यापुढे कोणाची हिंमत होणार नाही हे विचारायची की आई कुठे काय करते?" असा संवाद अरुंधती म्हणते अन् मालिकेचा प्रोमो संपतो.
'आई कुठे काय करते' शेवटच्या भागाची तारीख अन् वेळ
'आई कुठे काय करते' मालिकेच्या शेवटच्या भागाची तारीख अन् वेळही समोर आलीय. शनिवार ३० नोव्हेंबर दुपारी २.३० वाजता 'आई कुठे काय करते' मालिकेचा अंतिम भाग स्टार प्रवाहवर बघायला मिळेल. आवडीची मालिका आता संपणार म्हणून चाहत्यांना नक्कीच वाईट वाटलं असेल. या मालिकेत मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले, किशोर महाबोले, अश्विनी महांगडे, ईला भाटे, गौरी कुलकर्णी, ओमकार गोवर्धन या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.