रेल्वे स्टेशन गेटवर अडकला ट्रक; मूल-चंद्रपूर मार्ग पाच तास ठप्प
By राजेश मडावी | Updated: May 27, 2023 14:03 IST2023-05-27T14:01:59+5:302023-05-27T14:03:05+5:30
प्रवाशी हैराण : उड्डाणपूलाअभावी दररोज वाहतूक कोंडी

रेल्वे स्टेशन गेटवर अडकला ट्रक; मूल-चंद्रपूर मार्ग पाच तास ठप्प
चंद्रपूर : मूल रेल्वे स्टेशनच्या गेटवर मोठी मशिन घेऊन जाणारा ट्रक अडकल्याने शनिवारी मूल-चंद्रपूर मार्ग पाच तास ठप्प होता. सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. बस व खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना उन्हाच्या तडाख्यात ताटकळत राहावे लागते. उ्ड्डाणपूल नसल्याने दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीने सर्वच हैराण झाले आहेत.
मूल रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल नसल्याने एक गेट लावण्यात आला. या गेटमधून जडवाहने जाण्यास अडचणी येतात. शनिवारी मोठी मशिन घेऊन जाणारा ट्रक गेटमध्ये अडकल्याने मूल तहसील कार्यालयापासून ते जानाळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. गडचिरोली, ब्रह्मपूरीवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बस, ट्रॅव्हल्स वाहनातील प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. दरम्यान भर उन्हात प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सामजिक कार्यकर्ते श्याम उराडे व मित्र मंडळींनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलासा दिला.
रेल्वे गेट जवळ बांधकाम विभागाने एका बाजुला गतिरोधक तयार केले. मालवाहू वाहने गेटमध्ये अडकतात. त्यामुळे गतिरोध हटवावे व वाहतुकीची कोंडी दूर करावी, अशी मागणी मूल गुड मॉर्निंग ग्रुप सामाजिक संघटनेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्याची माहिती संयोजक जीवन कोंतमवार यांनी दिली.