This year the number of Rodavali IPOs; 3 thousand crore capital accumulation | यंदा रोडावली आयपीओंची संख्या; ११ हजार कोटींची पुंजी जमा
यंदा रोडावली आयपीओंची संख्या; ११ हजार कोटींची पुंजी जमा

- प्रसाद गो. जोशी

नाशिक : शेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम कंपन्यांमार्फत होणाऱ्या प्रारंभिक भाग विक्रीवर (आयपीओ) झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ ५० टक्के कंपन्यांचीच प्रारंभिक भागविक्री आतापर्यंत झाली आहे. बाजारात मध्यंतरी आलेल्या तेजीने आगामी काळामध्ये प्रारंभिक भाग विक्रीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
यावर्षीच्या नऊ महिन्यांमध्ये १३ कंपन्यांनी प्रारंभिक भाग विक्री केली. या विक्रीमधून त्यांनी सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे. सन २०१८ मध्ये २४ कंपन्यांनी प्रारंभिक भाग विक्रीतून ३० हजार ९५९ कोटी रुपयांची भांडवल उभारणी केली होती. याचा अर्थ गेल्या बाजाराला जाणवत असलेल्या अस्थिरतेचा फटका प्रारंभिक भाग विक्रीला बसला आहे. या वर्षाचे अडीच महिने बाकी असताना मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ३३ टक्केच रक्कम उभारली गेली.
ज्या १३ कंपन्यांनी या वर्षामध्ये प्रारंभिक भाग विक्री केली त्यापैकी आयआरसीटीसी आणि विश्वराज शुगर इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांची विक्री अनुक्रमे मागील गुरूवार व शुक्रवारी संपली. आयआरसीटीसीच्या समभागांची अ‍ॅलॉटमेंट उद्या, शुक्रवारी पूर्ण होईल. या समभागाची बाजारातील नोंदणी सोमवारी होणार असून याबाबत मोठी उत्सुकता आहे. विश्वराजच्या समभागांची शेअर बाजारातील नोंदणीही महिनाअखेर होण्याची अपेक्षा आहे.
मार्चपासूनच शेअर बाजारात अनिश्चितता जाणवू लागली. मेमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर बाजाराने झेप घेतली. परंतु केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर बाजारावर निराशेचे ढग दाटून आले आणि बाजार गडगडला. त्यामुळेच काही कंपन्यांनी प्रारंभिक भाग विक्री स्थगित केली. काही दिवसांपासून बाजारामध्ये वाढ होत आहे. आयआरसीटीसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा मोठ्या संख्येने आयपीओ येण्याची
शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षामध्ये १लाख ५ हजार कोटी रुपयांची निर्गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अंतरिम अर्थसंकल्पातील ८० हजार कोटी रुपयांच्या उद्दिष्टामध्ये त्यांनी १६
टक्के वाढ केली. त्यामुळेच येत्या
काळात केंद्र सरकारच्या अनेक
उद्योगांचे आयपीओ येण्याचीही शक्यता आहे.

१११ पटीने जास्त रक्कम
आयआरसीटीसीने आयपीओद्वारे ६५४ कोटी रुपयांचे समभाग विक्रीला काढले होते. त्याला मोठा प्रतिसाद लाभला असून हा इश्यू १११ पटीने जास्त रक्कम जमा करणारा ठरला.
यामुळे या कंपनीतील सरकारचे भांडवल ८७.४० टक्क्यापर्यंत खाली यईल. या इश्यूला मिळालेला प्रतिसाद बघता नजीकच्या काळात अनेक कंपन्या बाजाराचे दार ठोठावण्याची शक्यता आहे.

७५ टक्के कंपन्यांमध्ये फायदा : यंदा आलेल्या आयपीओपैकी ११ कंपन्यांची नोंदणी शेअर बाजारात झाली. ८ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला फायदा दिला. इश्यू किंमतीपेक्षा ७ ते ९५ टक्के अधिक रक्कम दिली.


Web Title: This year the number of Rodavali IPOs; 3 thousand crore capital accumulation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.