Women's jobs at MSME startups at risk. 31% staff cuts in establishments | एमएसएमई स्टार्टअपमध्ये महिलांची नोकरी धोक्यात. ३१ टक्के आस्थापनांमध्ये कर्मचारी कपात

एमएसएमई स्टार्टअपमध्ये महिलांची नोकरी धोक्यात. ३१ टक्के आस्थापनांमध्ये कर्मचारी कपात

मुंबई - देशातील सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्टअपमधील महिलांचीनोकरी धोक्यात आली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे घरकाम, मुलांचे आॅनलाइन शिक्षण आदी व्याप सांभाळून नोकरी करणे महिलांना अवघड जात आहे. त्यामुळेच जवळपास ३१ टक्के आस्थापनांतील २५ ते १०० टक्के महिलांना नोकरी गमवावी लागली. पुढील सहा महिने महिलांना नोकरी देण्याबाबत ५० टक्के आस्थापना उत्सुक नसल्याचे समजते.

कोरोनाचा सर्वाधिक फटका एमएसएमई आणि स्टार्टअप उद्योगाला बसला. या पार्श्वभूमीवर या उद्योगांच्या भवितव्याबाबतचा आढावा घेण्यासाठी लोकल सर्कल या संस्थेने आॅनलाइन सर्वेक्षण केले. यात सुमारे  १०४ औद्योगिक वसाहतीतल्या सात हजार उद्योगांनी भूमिका मांडली. सात टक्के आस्थापनांतील ५० ते १०० टक्के महिलांची नोकरी गेली आहे. २५ ते ५० टक्के महिला कर्मचाऱ्यांची कपात करणाºया आस्थापनांची संख्या २४ टक्के आहे. ४६ टक्के ठिकाणी कोणतीही कपात झालेली नसून एकाही ठिकाणी नवीन महिलेची नियुक्ती केली नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.

वेतन कायद्यामुळे दुजाभाव
2017 साली कायद्यात बदल करून प्रसूतीनंतर तीनऐवजी सहा महिने भरपगारी रजा देण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र, त्याचा विपरीत परिणाम दिसत आहे.
त्या काळातील आर्थिक भुर्दंड नको म्हणून अनेक आस्थापनांनी महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी केल्याचे निदर्शनास आले. छोट्या उद्योगांसाठी २६ पैकी सात आठवड्यांचे वेतन द्यावे ही सुधारणाही फारशी उपयुक्त ठरलेली दिसत नसल्याचे निरीक्षण या अहवालात मांडण्यात आले.

२५ टक्के उद्योग बंद : २५ टक्के एमएसएमई आणि स्टार्टअप कायमस्वरूपी बंद झाले आहेत. १५ टक्के उद्योगांनी ५० टक्के तर १९ टक्के उद्योगांनी २५ टक्के कर्मचारी कपात केलीे. १६ टक्के उद्योगांतील नोकºया वाढल्या असून उर्वरित ठिकाणी जैसे थे परिस्थिती आहे. त्यानुसार, सुमारे ७८ टक्के उद्योगांमध्ये नोकर कपात झाल्याचा निष्कर्ष लोकल सर्कलने काढला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Women's jobs at MSME startups at risk. 31% staff cuts in establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.