15 mango shipments : सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे. आतापर्यंत तुम्हीही दोनचारदा आमरसाचा आस्वाद घेतला असेल. भारतीय आंब्याला जगभरात मोठी मागणी आहे. अमेरिका हा त्याचा महत्त्वाचा खरेदीदार आहे. पण, नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने भारतातून पाठवलेल्या आंब्याच्या तब्बल १५ खेपा परत पाठवल्या आहेत, तर काही नष्ट केल्या आहेत. यामागे रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमधील गोंधळ असल्याचे कारण दिले आहे. अमेरिकेने नाकरलेल्या या आंब्यांची किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.
अमेरिकेत आंब्याची निर्यात थांबवली?
इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर ही आंब्याची वाहतूक थांबवण्यात आली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या. फळांमधील कीटकांना मारण्यासाठी आणि ती जास्त काळ ताजी राहावी यासाठी ही प्रक्रिया केली जाते. कागदपत्रांमध्ये गडबड असल्याचे कारण देत अमेरिकन कस्टम अधिकाऱ्यांनी हा माल स्वीकारण्यास नकार दिला.
अमेरिकेने आंबे का नाकारले?
आंबा निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार, खरी समस्या कीटकांची नव्हती, तर त्या कीटकांना मारण्याच्या प्रक्रियेच्या कागदपत्रांची होती. हे आंबे ८ आणि ९ मे रोजी मुंबईत रेडिएशन प्रक्रियेतून गेले होते. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) अधिकाऱ्याच्या देखरेखेखाली झाली होती. हा अधिकारी अमेरिकेत आंबा आयात करण्यासाठी आवश्यक असलेल्या PPQ203 फॉर्मवर सही करतो.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका निर्यातदाराने इकोनॉमिक टाइम्सला सांगितले की, नवी मुंबईतील रेडिएशन सेंटरमध्ये झालेल्या चुकांमुळे त्यांना हे नुकसान सोसावे लागले. त्यांच्या मते, यूएसडीए अधिकाऱ्याच्या उपस्थितीत असताना काहीतरी गडबड झाली.
आंबे परत येणार की नष्ट होणार?
अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमेरिकेतील आंबे नष्ट करण्याचा किंवा त्यांना भारतात परत पाठवण्याचा पर्याय दिला होता. पण आंबा लवकर खराब होणारा असल्याने आणि त्याला परत पाठवण्याचा खर्च खूप जास्त असल्याने, सर्व निर्यातदारांनी ते आंबे नष्ट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना सुमारे ४.२८ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे भारतीय आंबा निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे आणि अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठेत विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.