Taxes have increased from the budget, petrol and diesel prices have raged across the country | अर्थसंकल्पातून कर वाढवले, देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर भडकले  

अर्थसंकल्पातून कर वाढवले, देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर भडकले  

मुंबई - शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस वाढवण्यात आल्याचा परिणाम दिसू लागला असून, आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशभरात आज पेट्रोलचे दर प्रतिलीटर सुमारे अडीच रुपयांनी तर डिझॆलचे दर प्रतिलिटर सुमारे 2 रुपये 30 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे आज मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 78 रुपये 57 पैसे प्रतिलीटर तर डिझेलचा दर 69 रुपये 90 पैसे प्रतिलीटर झाला आहे. 

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये प्रतिलीटरच्या दराने एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावण्याची घोषणा केली होती. पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवल्याने सरकारी तिजोरीमध्ये 28 हजार कोटींची भर पडणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. 

 दरम्यान, पेट्रोल, डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचे अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकारने ठरविले आहे. मात्र आगामी काळात पेट्रोलचे दर नऊ रुपये तर डिझेलचे दर चार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल.

या दरवाढीचे संकेत सरकारने अर्थसंकल्पात आहेत. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढविण्याची अधिसूचना जारी होईल. वित्तीय कायदा २००२मध्ये त्यासाठी दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर पेट्रोलच्या दरात ७ ते १० रुपयांपर्यंत आणि डिझेलच्या दरात १ ते ४ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे दर पाहाता पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढणे अपरिहार्य आहे. 

 भारतामध्ये डिझेलची दरवर्षी ८.३ कोटी टन तर पेट्रोलची २.८ कोटी टन विक्री होते. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलची फक्त एक तृतीयांश विक्री होते. 

डिझेल महागल्यास महागाई भडकेल
महागाई फार भडकू नये यासाठी पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर कमी असतात. मालवाहतुकीसाठी डिझेलची वाहने वापरली जातात. त्यामुळे डिझेलचे दर खूप वाढविल्यास त्यामुळे मालवाहतूक खर्चही वाढेल. परिणामी सर्वच वस्तूंच्या किमती वाढून महागाईही आणखी भडकेल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taxes have increased from the budget, petrol and diesel prices have raged across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.