Share Market Falls : नवीन वर्षाची दमदार सुरुवात करणाऱ्या शेअर बाजाराने तिसऱ्याच दिवशी गुंतवणूकदारांची निराशा केली. आज बिअर बाजारावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत होते. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स सुमारे ६७० अंकांनी घसरला. तर निफ्टी २४,००० च्या पातळीवर खाली आला. विशेषत: आज आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये बरीच विक्री झाली. गेल्या दोन दिवसात कमावलेलं काही तासांत गमावलं अशी परिस्थिती आहे. कारण, मागील २ दिवसात बाजारात चांगली वाढ झाली होती. आजच्या घसरणीमागील ४ मोठी कारणे कोणती? ते समजून घेऊ.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड फ्युचर्स प्रति बॅरलचा भाव गुरुवारी १.७ टक्क्यांनी वाढून ७५.९३ डॉलर वर बंद झाले. ही वाढ प्रामुख्याने चीनची आर्थिक सुधारणा आणि परिणामी इंधनाच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा यामुळे झाली आहे. कच्च्या तेलाच्या उच्च किमतीमुळे भारतासारख्या तेल आयातदार देशांना महागाईचा धोका निर्माण होऊ शकतो, या शक्यतेने बाजारात भावना नकारात्मक झाली.
जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील वातावरण आव्हानात्मक आहे. डॉलर इंडेक्स १०९.२२ च्या पातळीवर पोहोचला आहे. तर यूएस १० वर्षाच्या ट्रेझरी बॉण्डवर उत्पन्न ४.५६% आहे. यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) अमेरिकेत गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत. याचा परिणाम भारतासारख्या उदयोन्मुख देशांवर होत आहे. संस्थात्मक परकीय गुंतवणूकदार गेल्या काही काळापासून येथे सातत्याने विक्री करत आहेत.
अमेरिकेत व्याजदर कपात
यूएस मधील लेबल मार्केटसाठी अलीकडील आकडा चांगला आहे. त्यामुळे यंदा फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आक्रमक कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने २०२५ मध्ये केवळ दोनदा व्याजदरात कपात केली आहे, तर यापूर्वी ४ वेळा कपात करणे अपेक्षित होते. अमेरिकेतील उच्च व्याजदरांमुळे भारतीय बाजार विदेशी गुंतवणूकदारांसाठी कमी आकर्षक बनतात. त्याचा प्रभाव विशेषतः TCS, Infosys इत्यादी IT कंपन्यांवर दिसून येतो, ज्यांच्या कमाईचा मोठा भाग अमेरिकन बाजारातून येतो.
टेक्निकल सेटअप
बाजार विश्लेषकांनी निफ्टीसाठी २४,००० च्या महत्त्वाच्या टेक्निकल सपोर्ट पातळीकडे लक्ष वेधले आहे. रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, जर ही पातळी तुटली तर निफ्टी बाजूला पडू शकतो, ज्यामुळे बाजारातील अस्थिरता वाढू शकते. बाजारातील सध्याची भावना लक्षात घेता ही तांत्रिक पातळी बाजारासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते, असेही ते म्हणाले.