Stock Market : वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात निराशेचे वातावरण पाहायला मिळाले. डिसेंबर मालिकेच्या एक्सपायरीपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स ३४६ अंकांनी घसरून ८४,६९६ वर बंद झाला, तर निफ्टी १०० अंकांच्या घसरणीसह २५,९४२ च्या पातळीवर खाली आला. निफ्टीने २६,००० चा महत्त्वाचा आधार स्तर तोडल्याने तांत्रिकदृष्ट्या बाजारात कमकुवतपणा दिसून येत आहे.
रेल्वे शेअर्समध्ये नफावसुली
गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेल्या रेल्वे शेअर्समध्ये सोमवारी गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. यामुळे आयआरएफसी आणि आरव्हीएनएलचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी घसरले. मेटल शेअर्सनी सकाळच्या सत्रात चांगली वाढ नोंदवली होती. मात्र, बाजार बंद होताना ते लाल निशाणीत स्थिरावले. बाजारात मंदी असतानाही टाटा कंज्युमर आणि एशियन पेंट्स यांसारख्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमतीत काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने एचपीसीएल आणि बीपीसीएलचे शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वधारले.
घसरणीची मुख्य पाच कारणे
- कमी ट्रेडिंग व्हॉल्यूम : सुट्ट्यांच्या हंगामामुळे बाजारातील सहभाग कमी झाला आहे. नोव्हेंबरमध्ये ३० कोटी शेअर्सची सरासरी उलाढाल असणारा निफ्टी डिसेंबरमध्ये २५ कोटींवर आला आहे.
- परकीय गुंतवणूकदारांची विक्री : परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ३१७.५६ कोटींची विक्री केली. सलग चौथ्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बाजारावर दबाव आहे.
- ब्रेंट क्रूडमध्ये उसळी : कच्च्या तेलाचा दर १.०४ टक्क्यांनी वाढून ६१.२७ डॉलरवर पोहोचला आहे, ज्यामुळे महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
- कमकुवत जागतिक संकेत : अमेरिकन बाजार सपाट बंद झाले, तर जपानच्या 'निक्केई' निर्देशांकातही घसरण पाहायला मिळाली.
- रुपयाची घसरण : डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांनी घसरून ८९.९५ च्या पातळीवर आला, ज्याचा फटका बाजार भावनेला बसला.
वाचा - दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
'इंडिया VIX' मध्ये ६ टक्क्यांची वाढ
बाजारामधील अस्थिरता दर्शवणारा 'इंडिया VIX' निर्देशांक ६ टक्क्यांनी उसळून ९.७१ वर पोहोचला आहे. हा निर्देशांक वाढणे म्हणजे गुंतवणूकदारांमध्ये घबराट आणि अनिश्चितता वाढल्याचे लक्षण मानले जाते.
