Rupee vs Dollar : भारतीय रुपया आणि शेअर बाजार या दोन्हीमध्ये गुरुवारी मोठी कमजोरी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरून ८८.६९ प्रति डॉलर या विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचला. देशांतर्गत बाजारातील नकारात्मकता आणि डॉलरची जागतिक मजबूती यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला.
रुपया का घसरत आहे?
विश्लेषकांच्या मते, रुपया कमकुवत होण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- डॉलरची मजबुती : सहा प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकेच्या डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर इंडेक्स ०.०२% वाढून ९९.५१ वर पोहोचला आहे. डॉलरची ही मजबुती केवळ रुपयावरच नव्हे, तर आशियातील इतर चलनांवरही दबाव आणत आहे.
- परदेशी गुंतवणूकदारांची विक्री : विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बाजारात सतत विक्रीचा सपाटा लावला आहे. बुधवारी त्यांनी तब्बल १,७५०.०३ कोटींचे शेअर्स विकले, ज्यामुळे रुपयावर अतिरिक्त दबाव वाढला.
- स्थानिक बाजारात नरमाई : देशांतर्गत शेअर बाजारात कमजोरी असल्याने गुंतवणूकदारांची धारणा नकारात्मक झाली आहे.
- यूएस-इंडिया व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेमुळे बाजारात काही सकारात्मकता कायम आहे, ज्यामुळे रुपयाला नीचांकी स्तरावर थोडा आधार मिळाला आहे.
शेअर बाजारही धडाधड खाली
रुपयाच्या घसरणीसोबतच देशांतर्गत शेअर बाजारातही कमजोरी दिसून आली.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०५.०८ अंकांनी घसरून ८४,२६१.४३ वर पोहोचला. तर निफ्टी-५० हा निर्देशांकही ६१.१५ अंकांनी घसरून २५,८१४.६५ वर कारोबार करत होता. ब्रेंट क्रूडच्या किमती ०.१३% ने कमी होऊन ६२.६३ डॉलर प्रति बॅरल वर आल्या आहेत.
पुढे काय होणार?
बाजार तज्ज्ञांच्या मते, रुपयाची पुढील दिशा काही महत्त्वाच्या जागतिक घटकांवर अवलंबून असेल.
- अमेरिकेच्या ट्रेझरी यील्ड्स
- कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतार
- FII च्या गुंतवणुकीचा कल
वाचा - SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
जर परदेशी गुंतवणूकदारांची विक्री अशीच सुरू राहिली आणि डॉलर इंडेक्स मजबूत राहिला, तर रुपयावर आणखी दबाव येऊ शकतो. मात्र, व्यापार करार आणि निर्यातीशी संबंधित सकारात्मक बातम्या मिळाल्यास रुपयाला स्थैर्य मिळू शकते.
