Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज, ८ डिसेंबर रोजी मोठी घसरण दिसून आली. विदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, काही निवडक क्षेत्रांमधील नफावसुली आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स ८०० हून अधिक अंकांनी क्रॅश झाला तर निफ्टी सुमारे २७० अंकांनी घसरला २५,९१७.४० रुपयांच्या स्तरावर व्यवहार करत होता. या घसरणीचा सर्वाधिक फटका स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सना बसला, जे व्यवहारादरम्यान २ टक्क्यांपर्यंत कोसळले.
शेअर बाजारातील आजच्या घसरणीची ६ मोठी कारणे
१. यूएस फेड मीटिंगपूर्वी सावध भूमिका
गुंतवणूकदार ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या दोन दिवसीय बैठकीपूर्वी सावध झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्राइम रिसर्च हेड, देवर्ष वकील यांनी सांगितले की, गुंतवणूकदार महागाईच्या आकडेवारी आणि वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पोर्टफोलिओ बदलांपूर्वी सावधगिरी बाळगून पोझिशन्स घेत आहेत.
२. स्मॉलकॅप-मिडकॅप शेअर्समध्ये जोरदार विक्री
बाजारात आज स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी नफावसुली झाली. निफ्टी स्मॉलकॅप १०० इंडेक्स २% हून अधिक तुटला आणि हा सलग पाचवा दिवस आहे, जेव्हा हा इंडेक्स लाल निशाणीवर आहे (५ दिवसांत ४% पेक्षा जास्त घसरण). निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्समध्येही २% ची घसरण झाली. ही घसरण आता लार्जकॅपपर्यंत पसरताना दिसत आहे. तज्ज्ञांनी वाढलेली अस्थिरता आणि विदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री यावर बोट ठेवले.
३. FII ची सततची विक्री
विदेशी संस्थागत गुंतवणूकदार सलग सातव्या दिवशी विक्री करत आहेत. शुक्रवारी त्यांनी ४३८.९० कोटींचे शेअर्स विकले. डिसेंबर महिन्यात त्यांनी आतापर्यंत एकूण १०,४०३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत, ज्यामुळे बाजाराचे सेंटिमेंट कमजोर झाले आहे.
४. भारतीय रुपयाची कमजोरी
सोमवारी भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १६ पैशांनी कमजोर होऊन ९०.११ प्रति डॉलर वर पोहोचला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विदेशी फंडच्या सततच्या काढणीमुळे रुपयावर दबाव वाढला आहे.
५. क्रूड ऑईलमध्ये वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव ०.१३% वाढून ६३.८३ डॉलर प्रति बॅरल वर पोहोचला. भारतासाठी तेलाच्या किमती वाढणे नेहमीच महागाईचे आणि आयात खर्चाचे कारण बनते, ज्यामुळे शेअर बाजारावर दबाव येतो.
६. इंडिया VIX मध्ये उसळी
अस्थिरता निर्देशांक, इंडिया VIX सोमवारी २.११% वाढून १०.५३ वर पोहोचला. या निर्देशांकात वाढ झाल्यामुळे बाजारात अनिश्चितता वाढल्याचे संकेत मिळतात, ज्यामुळे ट्रेडर्स सहसा धोका कमी करतात.
वाचा - चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
प्रमुख लूजर्स
निफ्टीवर आज इंडिगो, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि इटरनलचे शेअर्स टॉप लूजर्स राहिले आणि ७% पर्यंत घसरले.
