Indian Share Market : गेल्या ५ महिन्यांत भारतीय शेअर बाजार सपाटून आपटला आहे. याचं मुख्य कारण परकीय गुंतवणूकदारांनी (FPI) केलेली विक्री. ऑक्टोबर महिन्यापासून एफपीआयकडून सातत्याने विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे परकीय गुंतवणूकदार विक्री करुन मायदेशात नाही तर चीनमध्ये गुंतवणूक करत आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून २४,७५३ कोटी रुपये काढले आहेत. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून ३४,५७४ कोटी रुपये आणि जानेवारीत ७८,०२७ कोटी रुपये काढले होते. या वर्षात आतापर्यंत एफपीआयने एकूण १.३७ लाख कोटी रुपये काढले आहेत.
परकीय गुंतवणूकदारांनी का फिरवली पाठ?
परकीय गुंतवणूकदारांच्या सतत्या विक्रीमागे अनेक कारणे आहेत. यात प्रामुख्याने जागतिक आणि देशांतर्गत घटक कारणीभूत आहेत. अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीन यांसारख्या देशांवर उच्च शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतासह अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केल्याने बाजारात नकारात्मक प्रभाव पडला आहे. दुसरीकडे देशांतर्गत आघाडीच्या कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षाप्रमाने नसल्याने नकारात्मक भावना आणखी वाढली आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानेही एफपीआयला गुंतवणूक महाग वाटत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे ते सातत्याने विक्री करत आहे.
परकीय गुंतवणूकदारांची चीनला का पसंती?
रुपया घसरल्याने परकीय गुंतवणूकदारांचा नफा कमी झाला आहे. त्यातच केंद्रीय अर्थसंकल्पात कॅपिटल गेन टॅक्समध्ये वाढ केली. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर १२.५ टक्के कर आणि अल्प मुदतीवर २० टक्के कर आहे. इतर अनेक देशांमध्ये दीर्घ आणि अल्पमुदतीच्या गुंतवणुकीवर शून्य किंवा कमी कर आहे. अशात चीनने त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. साहजिकच परकीय गुंतवणूकदार तिकडे आकर्षित झाले नसते तरच नवल. यामुळे चिनी शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
चिनी बाजार करतोय मालामाल
हँगसेंग निर्देशांकाने भारतीय निफ्टीच्या ५ टक्के परताव्याच्या तुलनेत वार्षिक आधारावर २३.४८ टक्के परतावा दिला आहे. पण, हे अल्पकालीन व्यापार चक्र असू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कारण २००८ पासून चीनच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कामगिरी सातत्याने अपेक्षेपेक्षा कमी आहे. आकडेवारीनुसार, पुनरावलोकनाधीन कालावधीत, एफपीआयने सर्वसाधारण मर्यादेच्या अंतर्गत रोख्यांमध्ये २,४०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर ऐच्छिक प्रतिधारण मार्गाद्वारे ३७७ कोटी रुपये काढले. २०२४ मध्ये भारतीय बाजारपेठेतील FPI गुंतवणूक लक्षणीयरीत्या कमी होऊन ४२७ कोटी रुपये झाली. यापूर्वी २०२३ मध्ये त्यांनी भारतीय बाजारपेठेत १.७१ लाख कोटी रुपये टाकले होते. तर२०२२ मध्ये जागतिक मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात केलेल्या आक्रमक वाढीमुळे १.२१ लाख कोटी रुपयांची विक्री केली होती.