What is Unlisted Market: जेव्हा एखाद्या मोठ्या कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) येतो, तेव्हा तिच्या नावाची सर्वत्र चर्चा होते. याच काळात एक शब्द वारंवार ऐकू येतो की, IPO उघडण्यापूर्वीच त्या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये विकले जात आहेत. पण हे ग्रे मार्केट नेमकं काय आहे? आणि IPO येण्यापूर्वीच कंपनीचे शेअर्स कसे खरेदी केले जातात? चला, सोप्या भाषेत याबद्दल जाणून घेऊया.
ग्रे मार्केट म्हणजे काय?
सोप्या शब्दांत सांगायचं तर, ग्रे मार्केट म्हणजे एक अनौपचारिक बाजार (Unofficial Market). इथे कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वीच खरेदी-विक्री केले जातात. याला अनलिस्टेड मार्केट असेही म्हणतात, कारण हे शेअर्स अजून अधिकृतपणे बाजारात आलेले नसतात.
ग्रे मार्केट पूर्णपणे अनियंत्रित असते. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डचा यावर कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे, यात गुंतवणूक करणे खूप जोखीमपूर्ण असू शकते. जे गुंतवणूकदार IPO च्या इश्यू किमतीवर सट्टा लावतात, तेच ग्रे मार्केटमध्ये खरेदी-विक्री करतात.
IPO आधी शेअर्स कसे खरेदी करायचे?
ग्रे मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत.
- ब्रोकर्सद्वारे व्यवहार: काही ब्रोकर्स अशा सूचीबद्ध नसलेल्या शेअर्सचा व्यवहार करतात. त्यांच्या मदतीने तुम्ही खरेदी-विक्री करू शकता.
- कर्मचाऱ्यांकडून खरेदी: काहीवेळा कंपनीचे कर्मचारी किंवा प्रवर्तक IPO उघडण्यापूर्वीच त्यांचे शेअर्स विकू इच्छितात. त्यांच्याकडून थेट शेअर्स खरेदी करता येतात.
पण लक्षात ठेवा, या दोन्ही मार्गांमध्ये धोका खूप जास्त असतो. त्यामुळे, व्यवहार करताना विश्वासू ब्रोकर किंवा व्यक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे, आणि तो व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असायला हवा.
या शेअर्सची किंमत कशी ठरते?
ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची किंमत शेअर बाजाराप्रमाणे निश्चित नसते. इथे किंमत मागणी, पुरवठा आणि कंपनीच्या भविष्यातील कामगिरीच्या अंदाजावर अवलंबून असते. विक्रेत्याला मान्य झालेली किंमत दिल्यावर, 'ऑफ मार्केट ट्रान्सफर'द्वारे हे शेअर्स तुमच्या डीमॅट खात्यात येतात.
वाचा - जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
पण या प्रक्रियेतील सर्वात मोठा धोका म्हणजे, जर शेअर्स विकणाऱ्या व्यक्तीने ऐनवेळी माघार घेतली, तर तुम्ही त्याच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे, ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूक करताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.