Boat IPO: भारतातील सर्वात मोठा वियरेबल ब्रँड बोट आपल्या आयपीओसाठी शेअरहोल्डर्सकडून मंजुरी मिळाल्यानंतर बाजार नियामकाकडे ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल करण्याच्या तयारीत आहे. २०२२ मध्ये आपला पहिला प्रयत्न रद्द केल्यानंतर सार्वजनिक करण्याचा हा दुसरा प्रयत्न असेल.
रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे (ROC) केलेल्या फायलिंगनुसार, ब्रँडची मूळ कंपनी इमेजिन मार्केटिंगच्या भागधारकांनी एक विशेष ठराव मंजूर केला आहे. ज्यामुळे कंपनीला आयपीओ लाँच करण्याची परवानगी मिळेल, ज्यात ५०० कोटी रुपयांपर्यंत नवीन भांडवल उभं करण्याचा समावेश असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट एकूण २,०००-२,५०० कोटी रुपयांच्या आयपीओ साईजचा विचार करत आहे. परंतु अंतिम आकडा बाजारातील परिस्थिती आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असू शकतो. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
काय आहेत डिटेल्स?
गुडगावस्थित कंपनीनं आपल्या आयपीओसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, गोल्डमन सॅक्स आणि नोमुरा यांची बँकर म्हणून नियुक्ती केली आहे. २०२२ मध्ये बोटनं २००० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी दाखल केला होत, यात प्राथमिक भांडवल उभारणीसाठी ९०० कोटी रुपये आणि खासगी इक्विटी फर्म वारबर्ग पिंकसनं सेकंडरी सेलचे १,१०० कोटी रुपयांचा समावेश होता.
व्यवसायावर दबाव
गेल्या वर्षभरात मॅक्रोइकॉनॉमिक खप कमी झाल्यानं बोटच्या व्यवसायावर दबाव आला असून, त्याचा परिणाम वियरेबल्स सेगमेंट, विशेषत: स्मार्टवॉचवरही झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये बोटचा ऑपरेटिंग महसूल ५ टक्क्यांनी घसरून ३,२८५ कोटी रुपयांवर आला, तर वर्षभरात बोटचा तोटा लक्षणीयरीत्या कमी होऊन ७०.८ कोटी रुपये झाला आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)