Warren Buffett : सध्या जगभरातील शेअर बाजारांत प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. यामधून दिग्गज गुंतवणूकदारही सुटले नाहीत. जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफेट यांच्या कंपनीला, बर्कशायर हॅथवेला, एका गुंतवणुकीमुळे मोठा फटका बसला आहे. पॅकेज्ड फूड कंपनी क्राफ्ट हेन्झमधील गुंतवणुकीवर बर्कशायर हॅथवेला तब्बल ३.८ अब्ज डॉलरचे (सुमारे ३१,६०० कोटी) नुकसान सहन करावे लागले आहे.
हा बर्कशायर हॅथवेसाठी एक मोठा धक्का मानला जातोय, कारण वॉरेन बफेट ज्या कंपनीत गुंतवणूक करतात, ती कंपनी सहसा नफ्यात राहते. पण क्राफ्ट हेन्झच्या बाबतीत हे गणित पूर्णपणे उलट ठरले आहे.
बर्कशायर हॅथवेचा नफा ५९% नी घटला
२०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत, बर्कशायर हॅथवेच्या निव्वळ नफ्यात मोठी घट झाली. कंपनीचा नफा ५९% नी घसरून १२.३७ अब्ज डॉलर (सुमारे १०.७९ लाख कोटी रुपये) झाला. गेल्या वर्षी याच काळात कंपनीला ३०.२५ अब्ज डॉलर (सुमारे २६.३८ लाख कोटी रुपये) नफा झाला होता. या घसरणीमागे क्राफ्ट हेन्झमधील तोटा हे एक प्रमुख कारण आहे.
२०१५ मध्ये क्राफ्ट आणि हेन्झच्या विलीनीकरणापासून या कंपनीचे शेअर्स ६२% नी घसरले आहेत, तर याच काळात एस अँड पी ५०० निर्देशांकात २०२% वाढ झाली आहे. यामुळे बफेट यांना मोठा तोटा झाला.
कंपनीसमोर अनेक आव्हाने
सध्या क्राफ्ट हेन्झला अनेक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
- महागाईचा परिणाम : वाढत्या महागाईमुळे ग्राहकांच्या खर्चावर दबाव येत आहे, ज्यामुळे कंपनीच्या उत्पादनांची विक्री कमी झाली आहे.
- आरोग्याबद्दल जागरूकता: लोक आता आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत आणि त्यांनी निरोगी अन्न पर्यायांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, ते क्राफ्ट हेन्झऐवजी इतर उत्पादनांना प्राधान्य देत आहेत.
- व्यवसायाची पुनर्रचना: कंपनी आता तिच्या काही व्यवसायाचा भाग वेगळा करण्याचा विचार करत आहे, कारण कंपनी सातत्याने तोट्यात आहे.
वाचा - ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
बर्कशायर हॅथवेने गुंतवणूक कमी केली
क्राफ्ट हेन्झमध्ये बर्कशायर हॅथवेचा २७% हून अधिक हिस्सा आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बर्कशायर हॅथवेने कंपनीतील आपली गुंतवणूक कमी केली आहे. जून तिमाहीच्या अखेरीस, त्यांनी आपला हिस्सा ८.४ अब्ज डॉलरपर्यंत कमी केला. याशिवाय, या वर्षाच्या सुरुवातीलाच बर्कशायरच्या प्रतिनिधींनी क्राफ्ट हेन्झच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला आहे. यावरून बफेट यांची कंपनी या गुंतवणुकीतून हळूहळू बाहेर पडत असल्याचे स्पष्ट होते.