Vikran Engineering : ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची ईपीसी कंपनी 'विक्रान इंजिनीअरिंग लिमिटेड'ने मंगळवारी बाजारपेठेत मोठी झेप घेतली आहे. महाराष्ट्रात एकूण ६०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीला २,०३५.२६ कोटी रुपयांची भव्य ऑर्डर मिळाली आहे. या बातमीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून कंपनीच्या शेअरने आज १३ टक्क्यांपर्यंत मजल मारली.
'ऑनिक्स रिन्युएबल्स'सोबत महत्त्वपूर्ण करार
विक्रान इंजिनीअरिंगला हे कंत्राट 'ऑनिक्स रिन्युएबल्स' या कंपनीकडून मिळाले आहे. हे कंत्राट पूर्णपणे 'टर्नकी ईपीसी' तत्त्वावर आधारित आहे. म्हणजेच प्रकल्पाचे डिझाइन, इंजिनीअरिंग, साहित्याचा पुरवठा, इन्स्टॉलेशनपासून ते प्रकल्प कार्यान्वित करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी विक्रान इंजिनीअरिंगवर असेल. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. या ऑर्डरमध्ये केवळ प्रकल्पाची उभारणीच नाही, तर सौर पीव्ही मॉड्यूल्स आणि इन्व्हर्टर यांसारख्या प्रमुख उपकरणांच्या पुरवठ्याचाही समावेश आहे. हे सर्व प्रकल्प पुढील १२ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.
शेअर बाजारात 'विक्रानी' तेजी
एवढ्या मोठ्या रकमेचे कंत्राट मिळाल्याची बातमी धडकताच शेअर बाजारात विक्रान इंजिनीअरिंगच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. आज शेअरचा भाव १२.७५ टक्क्यांच्या वाढीसह ९७.७० रुपयांवर पोहोचला. तर गेल्या ५ दिवसांत या शेअरमध्ये सुमारे १३ टक्क्यांची सुधारणा झाली आहे.
विक्रान इंजिनीअरिंग ही पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन क्षेत्रातील एक वैविध्यपूर्ण ईपीसी कंपनी असून, डिझाइनपासून मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत सर्व स्तरांवर कंपनीची पकड मजबूत आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
