Vjiay Kedia : शेअर मार्केटमध्ये मोठा आर्थिक घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहता यांचे नाव तुम्हीही ऐकलं असेल. या घोटाळ्यावर आधारित 'स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी' या नावाची वेबसीरिजही आली आहे. या सीरीजमध्ये हर्षद मेहता यांनी बँकांकडून मिळवलेल्या बेकायदेशीर निधीचा वापर करून शेअर बाजारात कशी फसवणूक केली हे दाखवण्यात आले आहे. दरम्यान, या सीरिजमध्ये अनेक नावांचा उल्लेख आहे. ही सर्व नावं प्रत्यक्षात असून त्यांचीही प्रत्येकाची वेगवेगळी कथा आहे. असेच एक नाव आहे, विजय केडिया. मध्यवर्गीय कुटुंबातून आलेल्या विजय केडिया यांनी शेअर बाजारातून तब्बल ८०० कोटी रुपयांची संपत्ती जमा केली. हर्षद मेहता याच्या कार्यकाळातच त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केली होती.
वडिलांकडूनच मिळाले शेअर मार्केटचे धडे
टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विजय केडिया यांनी वडिलांकडूनच शेअर बाजाराचे धडे गिरवले. त्यांचे वडील कोलकात्यात स्टॉक ब्रोकर होते. विजय केडिया दहावीत शिकत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याच काळात दहावीत ते नापास झाले. दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी लहान वयातच त्यांच्या खांद्यावर आली. पण, इथेही विजय केडिया यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. कारण सुरुवातीला त्यांना शेअर बाजारात मोठा तोटा सहन करावा लागला. पुढे १९९० मध्ये ते कोलकाताहून मुंबईत आले. मुंबई शेअर बाजारात हर्षद मेहता यांचा दबदबा होता.
हर्षद मेहतामुळे झाला फायदा
त्याकाळी हर्षद मेहता यांच्या बुल रनमध्ये अनेकांनी हात धुवून घेतला. यामध्ये केडिया याचाही समावेश होता. विजय केडिया यांनी १९९२ च्या बुल रन दरम्यान ३५,००० रुपयांचे पंजाब ट्रॅक्टरचे शेअर्स खरेदी केले. काही दिवसांतच या शेअर्सची किंमत ५ पट वाढली. यानंतर त्यांनी एसीसी सिमेंटचे शेअर्स खरेदी केले, ज्याची किंमत एका वर्षात १० पटीने वाढली. यानंतर विजय केडिया यांनी मागे वळून पाहिले नाही.
दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला : विजय केडिया
विजय केडिया हे नेहमी शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ओळखले जातात. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून त्यांनी ५ पट, ७ पट आणि १० पट पैसे कमावले आहेत.
विजय केडिया यांची एकूण संपत्ती किती आहे?
फिनोलॉजीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, विजय केडिया यांच्याकडे सुमारे १३४७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सध्या १८ कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारी आहे. यामध्ये अतुल ऑटो, महिंद्रा हॉलिडे, सियाराम सिल्क मिल्स आणि सुदर्शन केमिकल आणि इतर नावांचा समावेश आहे.