Ventive Hospitality Share Listing : हॉस्पिटॅलिटी व्यवसायाशी संबंधित व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त सुरुवात केली. बीएसईवर व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीचा शेअर ११.६९ टक्क्यांच्या प्रीमियमसह ७१८.१५ रुपयांवर लिस्ट झाला. तर कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) ११.३५ टक्के प्रीमियमसह ७१६ रुपयांवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीच्या शेअरची किंमत ६४३ रुपये होती. कंपनीच्या पब्लिक इश्यूची एकूण साईज १६०० कोटी रुपयांपर्यंत होती.
लिस्टिंगनंतर आणखी तेजी
चांगल्या लिस्टिंगनंतर व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीच्या (Ventive Hospitality)शेअर्समध्ये आणखी वाढ दिसून आली. लिस्टिंगनंतर बीएसईवर व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीचा शेअर २ टक्क्यांनी वधारून ७३९.४५ रुपयांवर पोहोचला. तर एनएसईवर कंपनीचा शेअर ७३९.४० रुपयांवर पोहोचला होता. व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीचा आयपीओ २० डिसेंबर २०२४ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि २४ डिसेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिस्टेड आहेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ९९.५९ टक्के होता, तो आता ८८.९८ टक्क्यांवर आलाय.
१० पटींपेक्षा अधिक बोली
व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीचा आयपीओ एकूण १०.३३ पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ६.१९ पट तर, कर्मचारी वर्गाचा हिस्सा १०.०३ पट सबस्क्राइब झाला. व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीचा आयपीओ नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) श्रेणीत १४.६ पट, तर क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (क्यूआयबी) कोटा ९.५८ पट सबस्क्राइब करण्यात आला.
कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावता येणार होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये २३ शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओच्या एका लॉटसाठी १४,७८९ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
काय करते कंपनी?
फेब्रुवारी २००२ मध्ये व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीची सुरुवात झाली. ही कंपनी हॉस्पिटॅलिटी व्यवसायात आहे. कंपनी प्रामुख्यानं बिझनेस आणि लीज2र सेगमेंटवर लक्ष केंद्रित करते. व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीचा भर उच्च दर्जाची लक्झरी हॉटेल्स आणि रिसॉर्ट विकसित करणं आणि त्यांचं व्यवस्थापन करण्यावर आहे. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत कंपनीची भारत आणि मालदीवमध्ये ११ ऑपरेशनल हॉस्पिटॅलिटी असेट्स आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)