Timex Group India OFS: टायमेक्स ग्रुप इंडियाच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली असून हा शेअर १० टक्क्यांनी कोसळून ३१६.६० रुपयांवर आला. ही घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा कंपनीचा दोन दिवसांचा 'ऑफर फॉर सेल' (OFS) सोमवार, २९ डिसेंबरपासून मंगळवार, ३० डिसेंबरपर्यंत खुला राहणार आहे. या ऑफरच्या पहिल्या दिवशी केवळ मोठ्या नॉन-रिटेल गुंतवणूकदारांनाच अर्ज करण्याची परवानगी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (T+1), ही ऑफर किरकोळ गुंतवणूकदार आणि ज्या मोठ्या गुंतवणूकदारांच्या बोली पहिल्या दिवशी पूर्ण झाल्या नाहीत, त्यांच्यासाठी खुली असेल.
ओव्हरसबस्क्रिप्शन आणि ऑफरचा विस्तार
जर या ऑफरला गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला, तर प्रमोटर्स अतिरिक्त ४५,०९,२५० शेअर्स विकण्याचा पर्याय निवडू शकतात, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या ४.४७% आहे. असं झाल्यास, या OFS चा एकूण आकार वाढून तो कंपनीच्या पेड-अप भांडवलाच्या ८.९३% पर्यंत पोहोचू शकतो. या OFS साठी फ्लोअर प्राईस २७५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत शुक्रवारी बीएसईवर असलेल्या ३५१.७५ रुपयांच्या भावाच्या तुलनेत सुमारे २१.८१% सवलतीवर आहे.
बोर्ड मिटिंगची तारीख आणि आर्थिक निकाल
शुक्रवारीच टायमेक्स ग्रुप इंडियानं आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी बोर्ड मिटिंगची तारीखही जाहीर केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाची ही बैठक मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. या बैठकीमध्ये ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे आणि नऊ महिन्यांच्या अनऑडिटेड आर्थिक निकालांचे पुनरावलोकन केलं जाईल.
शेअरची दीर्घकालीन कामगिरी
आज जरी टायमेक्स ग्रुप इंडियाच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली असली, तरी दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा स्मॉल-कॅप शेअर सकारात्मक स्थितीत आहे. या शेअरनं गेल्या सहा महिन्यांत ४७%, चालू वर्षात ५६% आणि एका वर्षात ६३% वाढ नोंदवली आहे. पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीचा विचार केल्यास, हा शेअर मल्टीबॅगर ठरला असून त्यानं १०८७ टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
