Modern Diagnostic & Research Centre Ltd IPO: डायग्नोस्टिक क्षेत्रातील नामांकित कंपनी मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर लिमिटेड आपला आयपीओ (IPO) घेऊन येत आहे. हा ३६.८९ कोटी रुपयांचा बुक बिल्ड इश्यू असून, यामध्ये पूर्णपणे ०.४१ कोटी नवीन शेअर्सचा समावेश आहे. हा आयपीओ ३१ डिसेंबर २०२५ रोजी खुला होईल आणि २ जानेवारी २०२६ रोजी बंद होईल. शेअर्सचं वाटप ५ जानेवारी २०२६ रोजी होण्याची अपेक्षा असून, ७ जानेवारी २०२६ रोजी बीएसई एसएमई (BSE SME) वर कंपनीच्या लिस्टिंगची शक्यता आहे.
प्रति शेअर ९० रुपये प्राईस बँड निश्चित
या आयपीओसाठी प्रति शेअर ८५ ते ९० रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये १,६०० शेअर्स असतील. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २ लॉट म्हणजेच ३,२०० शेअर्ससाठी अर्ज करणं अनिवार्य असेल, ज्यासाठी वरच्या प्राईस बँडनुसार २.८८ लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल. तसेच, एचएनआय (HNI) गुंतवणूकदारांसाठी किमान ३ लॉट (४,८०० शेअर्स) निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी सुमारे ४.३२ लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूकदार ३,२०० शेअर्सपासून सुरुवात करून १,६०० च्या पटीत बोली लावू शकतात. दरम्यान, कंपनीचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये ट्रेड करत नाहीत.
कंपनीची पार्श्वभूमी आणि कार्यक्षेत्र
मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर लिमिटेडची स्थापना १९८५ मध्ये झाली. ही भारतातील एक बहु-राज्य डायग्नोस्टिक साखळी असून, ती पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजीशी संबंधित अनेक सेवा प्रदान करते. कंपनी होम सॅम्पल कलेक्शन, ऑनलाइन रिपोर्ट्स आणि संस्थात्मक ग्राहकांसाठी कस्टमाइज्ड टेस्ट पॅकेज उपलब्ध करून देते. एमडीआरसी (MDRC) देशातील ८ राज्यांमध्ये २१ केंद्रे (१७ लॅब आणि ४ डायग्नोस्टिक सेंटर्स) चालवते. या केंद्रांमध्ये अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, ईसीजी, पीएफटी यासह हृदय आणि न्यूरोशी संबंधित विशेष चाचणी सुविधा उपलब्ध आहेत.
निधीचा वापर आणि विस्तार योजना
आयपीओद्वारे उभारलेल्या निधीचा वापर कंपनी आपला विस्तार आणि आर्थिक मजबुतीसाठी करणार आहे. यातील सुमारे २०.६९ कोटी रुपये नवीन वैद्यकीय उपकरणं खरेदी करण्यासाठी खर्च केले जातील, ज्यामुळे लॅब आणि डायग्नोस्टिक सेंटर्स अपडेट करता येतील. याव्यतिरिक्त ११.६० कोटी रुपये वर्किंग कॅपिटल, ४.५० कोटी रुपये जुनं कर्ज फेडण्यासाठी आणि उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट खर्चासाठी वापरली जाईल. या इश्यूचे लीड मॅनेजर बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स आहेत, तर एमयूएफजी इनटाइम इंडिया स्ट्रॅटेजी आणि स्प्रेड एक्स सिक्युरिटीज मार्केट मेकरची भूमिका बजावत आहेत.
