TCS Dividend : देशातील दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारवर १४ टक्क्यांची मोठी घसरण झाली असून तो १०,६५७ कोटी रुपयांवर खाली आला आहे. मात्र, ही घसरण व्यवसायातील कमकुवतपणामुळे नसून, नव्या कामगार कायद्यांची तरतूद आणि अमेरिकेतील जुन्या कायदेशीर वादामुळे द्यावे लागलेले 'एक्सेप्शनल' शुल्क यामुळे झाली आहे.
निकालातील महत्त्वाचे आकडे
- निव्वळ नफा : १०,६५७ कोटी रुपये (१४% घट).
- महसूल : ६७,०८७ कोटी रुपये (५% वाढ).
- एआय कमाई : १८० कोटी डॉलर्स (वार्षिक आधारवर).
नफा का घटला? 'या' ३ कारणांमुळे पडला बोजा
- नवे कामगार कायदे : भारतात लागू झालेल्या नव्या लेबर कोडमुळे ग्रॅच्युइटी आणि इतर लाभांच्या तरतुदीसाठी कंपनीला २,१२८ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागला.
- कर्मचारी पुनर्रचना : जुलै २०२५ मध्ये जाहीर केलेल्या वर्कफोर्स रॅशनलायझेशन अंतर्गत दिलेल्या टर्मिनेशन बेनिफिट्समुळे कंपनीवर आर्थिक भार पडला.
- अमेरिकेतील कायदेशीर वाद : 'कॉम्प्युटर सायन्सेस कॉर्पोरेशन'शी संबंधित जुन्या प्रकरणात अमेरिकन न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर टीसीएसला १,०१० कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे.
- महत्त्वाची नोंद : जर हे एकवेळचे खर्च वगळले, तर टीसीएसचा वास्तविक नफा १३,४३८ कोटी रुपये होतो, जो मागील वर्षाच्या तुलनेत ८.५ टक्क्यांनी अधिक आहे.
शेअरधारकांसाठी आनंदाची बातमी
नफ्यात घट झाली असली तरी बोर्डाने गुंतवणूकदारांना खूश केले आहे. कंपनीने प्रति शेअर ५७ रुपयांचा एकूण लाभांश जाहीर केला आहे. यामध्ये स्पेशल डिव्हिडंड ४६ रुपये प्रति शेअर, इंटरिम डिव्हिडं ११ रुपये प्रति शेअर देणार आहेत. यासाठी १७ जानेवारी २०२६ ही रेकॉर्ड डेट असून, ३ फेब्रुवारीपर्यंत हा पैसा गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठरतेय 'गेम चेंजर'
टीसीएसने 'एआय' आधारित सेवांमधून आपली पकड मजबूत केली आहे. कंपनीची वार्षिक एआय कमाई आता १.८ अब्ज (१८० कोटी) डॉलर्सवर पोहोचली आहे. क्लाउड, सायबर सिक्युरिटी आणि डेटा ट्रान्सफॉर्मेशन सारख्या क्षेत्रात एआय आधारित प्रकल्पांना मोठी मागणी असल्याचे सीईओ के. कृतिवासन यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी एआय-आधारित तंत्रज्ञान कंपनी बनण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.
वाचा - रिटायरमेंटचं टेन्शन सोडा! १ कोटींचा फंड तयार करण्यासाठी किती करावी लागेल SIP? सोपं गणित
शेअर बाजाराची प्रतिक्रिया
निकाल जाहीर होण्यापूर्वी 'एनएसई'वर टीसीएसचा शेअर १.१ टक्क्यांच्या वाढीसह ३,२४३ रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये २४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली असली, तरी कंपनीचा लाभांश देण्याचा इतिहास गुंतवणूकदारांना धीर देणारा ठरत आहे.
