TATA Sons Profit Increase: टाटा समूहाची प्रमुख गुंतवणूक होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचा निव्वळ नफा गेल्या पाच वर्षांत जवळजवळ दहा पटीनं वाढला आहे. २०२४-२५ मध्ये या कंपनीचा नफा २६,२३२ कोटी रुपयांपर्यंत वाढला. टाटा सन्सच्या ताज्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
कंपनीनं २०१९-२० या आर्थिक वर्षात २,६८० कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २०१९-२० मधील २४,८९६ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये दीड पटीने वाढून ३८,८३५ कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीची एकूण मालमत्ता देखील जवळपास साडेतीन पटीनं वाढून ४५,५८६ कोटी रुपयांवरून १,४९,६८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
टाटा मोटर्सची सर्वाधिक कमाई
टाटा सन्सच्या २०२४-२५ च्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये टाटा समूहाचा एकूण महसूल १५,३४,३४१ कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ७,८९,०५७ कोटी रुपये होता. २०२४-२५ मध्ये तो ४,४५,९३९ कोटी रुपये झाला. दरम्यान, शेअर बाजारात लिस्टेड कंपनी असलेल्या टाटा मोटर्सचा समूहात सर्वाधिक महसूल आहे.
त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा स्टील अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सोमवारी टाटा मोटर्सचा स्टॉक फोकसमध्ये राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर १.८५ टक्क्यांच्या घसरणीसह ६८७.५५ रुपयांवर बंद झाला.
लिस्ट नसलेल्या कंपन्यांमध्ये, एअर इंडियानं ७८,६३६ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, तर टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं ६६,६०१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. वार्षिक अहवालानुसार, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचं २०२४-२५ मध्ये एकूण वेतन १५५.८१ कोटी रुपये होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)