Tata Group : टाटा समूहातील टेलिकॉम कंपनी Tejas Networks सध्या गंभीर संकटातून जात असल्याचे चित्र शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण होत असून, गुंतवणूकदारांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. आज(दि.12) तेजस नेटवर्कचा शेअर घसरुन 365 रुपयांपर्यंत आला. विशेष म्हणजे, जुलै 2024 मध्ये या शेअरने 1,450 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच हा शेअर आपल्या उच्चांकापासून सुमारे 75 टक्क्यांनी कोसळला आहे.
एका दिवसात मोठी घसरण
सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तेजस नेटवर्कचा शेअर 10.58 टक्क्यांनी घसरून 373 रुपयांवर व्यवहार करत होता. आकडेवारीनुसार गेल्या एका महिन्यात हा शेअर 23%, सहा महिन्यांत 50% तर, एका वर्षात 62% पेक्षा अधिक घसरला आहे.
2024 मधील तेजी आता इतिहासजमा
2024 साली तेजस नेटवर्कच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. टेलिकॉम क्षेत्रातील ऑर्डर्स, 5G संदर्भातील अपेक्षा आणि टाटा समूहाचा पाठिंबा यामुळे शेअरने झपाट्याने उसळी घेतली होती. मात्र, सध्याच्या घडीला ही तेजी पूर्णपणे ओसरली असून, शेअर घसरणीच्या गर्तेत सापडला आहे.
गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता
शेअरमध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे किरकोळ तसेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. टाटा समूहाची कंपनी असूनही अशी घसरण का? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदार उपस्थित करत आहेत. तेजस नेटवर्कच्या शेअरमधील घसरण ही केवळ बाजारातील चढ-उतारांपुरती मर्यादित नसून, कंपनीच्या आर्थिक कामगिरी, ऑर्डर बुक, स्पर्धा आणि भविष्यातील महसूल याबाबत बाजारात असलेल्या अनिश्चिततेचे प्रतिबिंब मानले जात आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या.)
